
हिंदुस्थानात शिक्षणाचा स्तर झपाट्याने वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. परंतु वेगाने नोकऱ्यांची निर्मिती होत नसल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. परिणामी, विशेषतः पदवीधर तरुणांमध्ये बेरोजगारीचा प्रश्न अधिक तीव्र होताना दिसू लागला आहे. पदवीधर तरुणांमध्ये सध्याच्या घडीला बेरोजगारीचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. हिंदुस्थानात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पदवीधर तयार होत आहेत; मात्र त्या तुलनेत नोकऱ्यांची निर्मिती होत नसल्याने, आता परिस्थिती अधिक गंभीर झालेली आहे. शिक्षण पूर्ण करूनही अनेक तरुण बेरोजगार राहताना निदर्शनास येत आहेत. अहवालानुसार 15 ते 25 वयोगटातील जवळपास 40% पदवीधर बेरोजगार आहेत, तर 25 ते 29 वयोगटातही सुमारे 20% बेरोजगारी आहे. चांगले शिक्षण घेऊनही पुन्हा एकदा तरुणांसह तरुणीही आता शेतीकडे वळताना दिसत आहेत.
अलीकडील आकडेवारीनुसार, हिंदुस्थानातील तरुणांमध्ये शिक्षणाचा ध्यास हा अधिक वाढलेला आहे. मात्र शिक्षण आणि रोजगार यामध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. उच्च शिक्षण घेतल्यानंतरही अपेक्षित नोकऱ्या आणि उत्पन्न मिळत नसल्याने तरुणांमध्ये नाराजी वाढताना दिसत आहे. पदवीधर आणि अपदवीधर यांच्यातील वेतनातील फरकही कमी होत चालला आहे. पदवीधरांना मिळणारे अतिरिक्त उत्पन्न मर्यादित असल्याने, शिक्षण म्हणजे चांगली नोकरी हे समीकरण आता पुसट होताना दिसत आहे.
ग्रामीण भागातही नोकऱ्यांची परिस्थिती ही अधिक बिकट होत चालली आहे. अलीकडे पुन्हा मोठ्या प्रमाणात महिला शेतीकडे वळताना दिसत आहेत. ग्रामीण भागात रोजगाराच्या मर्यादित असलेल्या संधी हे त्यामागील प्रमुख कारण मानले जात आहे. हिंदुस्थानात सर्वाधिक तरुण असल्याने ही मोठी ताकद मानली जाते. परंतु योग्य वेळी पुरेशी रोजगारनिर्मिती झाली नाही तर, हीच ताकद भविष्यात आव्हान ठरु शकते, अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.


























































