कुत्र्यांवर नियंत्रणासाठी ऍनिमल वेल्फेअरकमिटी, हायकोर्टाचे पालिकेला निर्देश

कांदिवली येथील हाऊसिंग सोसायटीच्या आवारात भटक्या कुत्र्यांद्वारे चावा घेण्याचे प्रमाण वाढले आहे. या घटनांकडे लक्ष वेधत सोसायटीने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. सोसायटीच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी करताना न्यायालयाने पालिकेला ‘ऑनिमल वेल्फेअर कमिटी’ नेमण्याचे निर्देश दिले. कुत्रे आक्रमक आहेत की नाही याचे मूल्यांकन न्यायालय करू शकत नाही, असे न्यायालयाने यावेळी नमूद केले.

कांदिवलीतील ‘आरएनए रॉयल पार्क को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी’ने दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. सोसायटीतील रहिवासी असलेल्या प्राणीप्रेमींकडून कुत्र्यांना खायला घातले जाते. त्यामुळे भटके कुत्रेही सोसायटीच्या आवारात येऊन ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांचा चावा घेत आहेत याकडे सोसायटीच्या वकिलांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.