पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या अटल सेतूवरील रस्त्याला अवघ्या तीन महिन्यांतच भेगा पडल्या आहेत. इतकेच नव्हे तर या सेतूच्या नवी मुंबईकडील रस्ता एक फूट खाली खचला आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज अटल सेतूची प्रत्यक्ष पाहणी करून हा प्रकार समोर आणल्याने मिंधे सरकारच्या कमिशनखोरीचा पर्दाफाश झाला आहे.
नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत आज अटल सेतूची पाहणी केली. सेतूवरील रस्त्याला पडलेल्या भेगा पाहून त्यांनाही धक्का बसला. या भेगा म्हणजे मिंधे सरकारच्या भ्रष्टाचाराचा पुरावा असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. मिंधे सरकारने भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा ओलांडल्या असून कर्नाटकातील आधीचे भाजपा सरकार 40 टक्के कमिशनवाले होते, पण मिंधे सरकार तर 100 टक्के कमिशनखोर आहे, असा आरोप त्यांनी केला.
शिवडी ते न्हावा शेवा असा हा अटल सेतू आहे. या प्रकल्पावर मिंधे सरकारने 18 हजार कोटी रुपये खर्च केला असून त्यासाठी बँकेकडून कर्ज काढले आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव या प्रकल्पाला दिले आहे, त्यांच्या नावाने भ्रष्टाचार करणे हे दुर्भाग्यपूर्ण आहे, असे ते म्हणाले.
मुख्य भागावर कोणतेही तडे नाहीत – एमएमआरडीए
अटल सेतू पुलाच्या मुख्य भागावर कोणतेही तडे गेले नसून सेतूला जोडणाऱया पोहोच मार्गावर किरकोळ भेगा आढळून आल्या आहेत. हा पोहोच मार्ग मुख्य पुलाचा भाग नसून तो पुलाला जोडणारा सेवा रस्ता आहे. तसेच उत्पन्न झालेल्या भेगा या प्रकल्पातील संरचनात्मक दोषांमुळे नाहीत. त्यामुळे पुलाच्या संरचनेला कोणताही धोका नसल्याचे लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे स्पष्टीकरण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) देण्यात आले आहे. भेगा दुरुस्तीचे काम सुरू केले असून सेतूवरील वाहतुकीला कोणताही अडथळा न होऊ देता 24 तासांत हे काम पूर्ण केले जाणार असल्याचेही सांगण्यात आले.