आलिशान घर, महागड्या गाड्या, मनसोक्त जगण्यासाठी दागिन्यांची चोरी; राजस्थानला पळालेल्या चोराला पकडले

सराफाचा विश्वासघात करत दुकानात कामाला ठेवलेल्या तरुणाने तब्बल चार कोटी सात लाख 38 हजार रुपयांचे दागिने व रोकड घेऊन पोबारा केला. मोठा हात मारून तो मुंबईबाहेर सटकला आणि थेट राजस्थानातील आपले गाव गाठले. त्याला चोरलेल्या ऐवजातून आलिशान घर, महागडय़ा गाडय़ा घेऊन आपले सर्व शौक पूर्ण करायचे होते; पण भोईवाडा पोलिसांनी गुन्हे शाखेच्या मदतीने त्याला वेळीच उचलून त्याचे मनसुबे उधळून लावले.

जितू चौधरी (23) असे अटक आरोपीचे नाव आहे. जितू परळ येथील वर्धमान इमारतीत असलेल्या जालिंदर ज्वेलर्स शॉपमध्ये कामाला होता. काही दिवस इमानेइतबारे काम केल्यानंतर जितूने संधी साधत दुकानातील चार कोटी सात लाख 38 हजार रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने व रोकड घेऊन पोबारा केला. याप्रकरणी दुकानमालकाने तक्रार दिल्यानंतर भोईवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ निरीक्षक दत्तात्रय ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन बोरसे, अमित कदम, ओंकार आडके तसेच गुन्हे शाखा युनिट-4 चे सपोनि अजय बिराजदार तसेच महाजन, जावीर, चव्हाण व पथकाने तपास सुरू केला. तेव्हा आरोपी हा राजस्थान येथील सादडा गावात गेल्याचे समोर आले. त्यानुसार पोलीस पथकाने सादडा गाव गाठून जितू चौधरी याला पकडले. तसेच जितूने चोरीचा ऐवज कमलेश चौधरी, भरतकुमार चौधरी यांच्याकडे लपवला होता. त्यामुळे पोलिसांनी कमलेश व भरतकुमार यांनाही अटक करून चोरीचा तब्बल 70 टक्के ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

12 दिवसांत साडेतीन लाख उधळले

जितूने चोरलेल्या रोकडपैकी साडेतीन लाख अवघ्या 12 दिवसांत खर्च केले. त्याने एवढे पैसे एमडी, दारू तसेच बाईवर खर्च केल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते. जितूला आलिशान घर आणि महागडय़ा गाडय़ा घ्यायच्या होत्या. शिवाय बाई, बाटली व ड्रग्जची मज्जा घ्यायची होती. पण पोलिसांनी त्याला दणका दिला.