श्रीगोंद्यातील खून, दरोडय़ाच्या गुह्यातील टोळी गजाआड

श्रीगोंदा तालुक्यातील अरणगाव दुमाला येथील वस्तीवर खून करून दरोडा टाकणाऱया गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. याप्रकरणी तीनजणांना अटक केली असून, एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे.

निमकर अर्जुन काळे (वय 21, रा. रांजणगाव मशीद, ता. पारनेर), शेखर उदास भोसले (वय 20), अतुल उदास भोसले (वय 19, दोघे रा. कोळगाव, ता. श्रीगोंदा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.  कल्याण गायकवाड असे मृताचे नाव आहे. शर्मिला कल्याण गायकवाड (दोघे रा. अरणगाव दुमाला, बेलवंडी, ता. श्रीगोंदा) यांनी फिर्याद दिलेली आहे.

14 मार्च रोजी रात्री गायकवाड कुटुंबीय घरात झोपलेले असताना चारजणांनी दरवाजा उघडून त्यांच्या घरात प्रवेश केला होता. हत्याराचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोख रकमेची चोरी करून घेऊन जात असताना कल्याण गायकवाड यांनी त्यांना विरोध केला होता. त्यामुळे चोरटय़ांनी त्यांच्या डोक्यात हत्याराने वार केले होते. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. चोरटय़ांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी बेलवंडी पोलिसांत खुनासह जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.

दरम्यान, रांजणगाव मशीद येथील निमकर काळे याने त्याच्या साथीदारांसह हा गुन्हा केला असून, ते पुणे जिह्यातील तळेगाव दाभाडे येथील जुना टोलनाका येथे पळून गेल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. कटके यांच्या सूचनेवरून पोलीस पथकाने तळेगाव दाभाडे येथे वेशांतर करून सापळा रचला. पथक आरोपींना ताब्यात घेण्याच्या तयारीत असतानाच त्यांना पोलीस पथकाची चाहूल लागताच ते पळून जाऊ लागले. पथकाने त्यांचा पाठलाग करून चारजणांना ताब्यात घेतले, तर तीनजण डोंगर व झाडाझुडपांचा फायदा घेऊन पळून गेले. आरोपींनी श्रीगोंदा तालुक्यातील रायगव्हाण व पारनेर तालुक्यातील वडनेर हवेली, राळेगण थेरपाळ येथे मारहाण करून चोरी केल्याची कबुली दिली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, हेड कॉन्स्टेबल सुनील चव्हाण, बबन मखरे, दत्तात्रय हिंगडे, संदीप पवार, बापूसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक ज्ञानेश्वर शिंदे, शंकर चौधरी, भीमराज खर्से, रवि सोनटक्के, कॉन्स्टेबल विनोद मासाळकर, योगेश सातपुते, मच्छिंद्र बर्डे, मेघराज कोल्हे, चंद्रकांत कुसळकर, भरत बुधवंत या पथकाने ही कारवाई केली.