एकहाती सत्ता असूनही धनगर आरक्षणाचा निर्णय का नाही? रोहित पवार यांचा सवाल

एकहाती सत्ता असूनही धनगर आरक्षणाचा निर्णय का नाही? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी विचारला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांचा अभ्यास अजूनही सुरूच आहे का? असा टोलाही त्यांनी लगावला.

आज चौंडीमध्ये राज्य सरकारची बैठक सुरू आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, सत्ता आल्यावर पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणाचा निर्णय मार्गी लावण्याचं आश्वासन देऊन आज 10 वर्षे उलटली आणि 300 हून अधिक मंत्रिमंडळ बैठका झाल्या.. शिवाय केंद्रात आणि राज्यात भाजपची एकहाती सत्ता असूनही धनगर आरक्षणाचा निर्णय अजूनही का होऊ शकला नाही?

तसेच राज्य सरकारने प्रस्ताव पाठवला आणि केंद्राची मान्यता घेतली की लगेच प्रश्न मिटेल, असं सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा अभ्यास अजूनही सुरूच आहे का? राज्यसरकारचे सकारात्मक प्रयत्न कधी फळास येतील?

किमान आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पवित्र जन्मभूमी चौंडी जेथे आरक्षणाच्या लढ्याची सुरवात झाली आज त्याच पवित्र भूमीत प्रथमच होत असलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तरी हा प्रश्न मार्गी लावला जाईल याची राज्यातील तमाम धनगर समाज बांधव वाट बघत आहेत. या पवित्र भूमीचे पावित्र्य लक्षात ठेवून तरी सरकार नेहमीप्रमाणे केवळ पोकळ घोषणा करून आणि आश्वासने देऊन बोळवण करणार नाही आणि दगाफटका करणार नाही, ही अपेक्षा! असेही रोहित पवार म्हणाले.