मंत्रीपदावरून गच्छंतीची वेळ येताच राजकीय निवृत्तीचे वेध लागले, रोहित पवार यांची संजय शिरसाठ यांच्यावर टीका

सरकारची 5-6 हजार कोटी रुपयांची जमीन खासगी लोकांच्या घशात घातल्याचा इंच इंच हिशोब संजय शिरसाट यांना द्यावाच लागेल असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे. तसेच मंत्रीपदावरून गच्छंतीची वेळ येताच राजकीय निवृत्तीचे वेध लागले अशी टीकाही रोहित पवार यांनी केली.

एक्सवर पोस्ट करून रोहित पवार म्हणाले की, मा. संजय शिरसाठ साहेब सिडकोत मलिदा खाताना कुठंतरी थांबावं असा विचार का आला नाही? आता मंत्रीपदावरून गच्छंतीची वेळ येताच राजकीय निवृत्तीचे वेध लागले. भूमिपुत्रांचा हक्क डावलून सिडकोची हजारो कोटी रुपयांची जमीन बिवलकर कुटुंबाच्या आणि खासगी बिल्डरांच्या घशात घालणारी आपल्यासारखी व्यक्ती जेवढे दिवस राजकारणात राहील तेवढे दिवस लोकांचं नुकसानच होणार आहे… पण आता वय पुढं करून पळ काढू नका… सरकारची ५-६ हजार कोटी रुपयांची जमीन खासगी लोकांच्या घशात घातल्याचा इंच इंच हिशोब तुम्हाला द्यावाच लागेल…! आता सुट्टी नाही!

राहिला प्रश्न माझ्याबाबत तुम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांचा, तर वेळ आणि ठिकाण तुम्ही सांगा… तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी समोरासमोर देतो माझ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्या असेही रोहित पवार म्हणाले.