अजितदादांच्या नावापुढं स्वर्गीय शब्द लावण्याचं धाडस करू नका, रोहित पवार यांचं भावनिक आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अजित पवार आपल्यातच होते, आपल्यातच आहेत आणि त्यांच्या कामातून ते कायम आपल्यातच राहाणार. त्यामुळे अजितदादांच्या नावापुढे स्वर्गीय शब्द लावण्याचं धाडस माझ्यात नाही तसं आपणही करू नये, असे भावनिक आवाहन अजित पवार यांचे पुतने आणि खासदार रोहित पवार यांनी केले आहे.

रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अजितदादांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना अनुसरून भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ते म्हणाले की, ” बारामतीचं दुसरं नाव म्हणजे आदरणीय साहेब आणि मा. अजितदाद. आजपर्यंत या दोघांपैकी ज्याला सत्तेचं पद मिळायचं त्यांच्या अभिनंदनाचे बारामतीत मोठमोठे बॅनर दिसायचे. त्यावर उपमुख्यमंत्रीपदी निवड किंवा भावी मुख्यमंत्री अशा ठसठशीत अक्षरात मा. अजितदादांचा देखणा आणि राजबिंडा फोटो असायचा. ते पाहून मन आनंदाने भरुन यायचं आणि अभिमानही वाटायचा पण आज? डोंगराएवढ्या दुःखापुढं आज पहिल्यांदाच ना पदाचं कौतुक आहे. ना आनंदाचा जल्लोष. गळ्यात हार घातलेला मा. अजितदादांचा फोटो पाहणं डोळ्यांना सहन होत नाहीये.” असं रोहित पवार म्हणाले आहेत.

“आज बारामतीत अभिनंदनाच्या जागी श्रद्धांजलीचे बॅनर आहेत, पण हे लावणाऱ्या आणि मा. अजितदादांवर अतीव प्रेम करणाऱ्या सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की, मा. अजितदादा हे आपल्यातच होते, आपल्यातच आहेत आणि त्यांच्या कामातून ते कायम आपल्यातच राहणार..! त्यामुळं मा. अजितदादांच्या नावापुढं स्वर्गीय शब्द लावण्याचं जसं धाडस माझ्यात नाही तसं आपणही करू नये.” असं भावनिक आवाहन रोहित पवार यांनी केलं आहे.