‘भटकत्या आत्म्याची भीती अजूनही उतरली नसावी, म्हणून…’, रोहित पवार यांचा थेट पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवरून राजकारण तापले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद जम्मू-कश्मीर आणि हरयाणाची विधानसभा निवडणूक जाहीर केली. याच पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र निवडणूक आयोगाने वेगवेगळी कारणं देत निवडणूत तुर्तास टाळली. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी थेट पंतप्रधा नरेंद्र मोदींवरच निशाणा साधला आहे.

रोहित पवार यांनी सोमवारी सकाळी आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये येण्याचे टाळत असल्याचा आरोप केला. तसेच लोकसभा निवडणुकीवेळी मोदींनी शरद पवार यांचा भटकता आत्मा असा उल्लेख केला होता, याचाही उल्लेख करत रोहित पवारांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली.

एक-दोन महिन्यात निवडणुका असणाऱ्या राज्यात दोन-तीन दिवसाआड कार्यक्रम घेणारे पंतप्रधान मोदी साहेब निवडणुका जवळ आल्या असतानाही महाराष्ट्रात कार्यक्रमास येणे टाळत आहेत. विकासाच्या बाबतीत तसेच बजेटमध्ये केंद्राकडून दुर्लक्षित झालेला महाराष्ट्र आता राजकीय बाबतीतही दुर्लक्षित होत असल्याची चर्चा आहे, असे रोहित पवारांनी म्हटले.

राज्यसरकार विरोधात असलेल्या रोषातून महाराष्ट्रात वाहणाऱ्या परिवर्तनाच्या वाऱ्याचा अंदाज केंद्रीय नेतृत्वाला आला असावा किंवा भटकत्या आत्म्याची भीती अजूनही उतरली नसावी, म्हणूनच महाराष्ट्राकडं दुर्लक्ष केलं जात असेल. पण परिवर्तनानंतर लवकरच महाराष्ट्राला राजकीय सुसंस्कृतपणाचं आणि आर्थिक सत्तेचं गतवैभव प्राप्त होईल, याची खात्री आहे, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.

कंत्राटी भरतीवरून निशाणा

देशभरात IAS अधिकाऱ्यांची पदं मोठ्या प्रमाणात रिक्त असताना lateral entry च्या माध्यमातून केंद्रीय मंत्रालयांमध्ये सचिव पदांच्या 45 जागा कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय म्हणजे मूर्खपणाचा कळसच म्हणावा लागेल. lateral entry च्या माध्यमातून गुजरातमधील काही जवळच्या लोकांना तसंच जवळच्या संघटनांशी संबंधित लोकांना आडमार्गाने या महत्वपूर्ण पदांवर बसवून देशाची यंत्रणाच हायजॅक करण्याचा हा डाव आहेच शिवाय यामुळं संविधान, आरक्षण मात्र पूर्णतः धोक्यात येण्याचीही शक्यता आहे. असो! या निर्णयातून भाजपचे आरक्षण विरोधी मूलतत्व पुन्हा अधोरेखित झालं, परंतु यामुळं #IAS होण्याचं स्वप्न उराशी बाळगून मोठ्या जिद्दीने कष्ट करणाऱ्या स्पर्धा परीक्षार्थी युवांचा विचार सरकार करणार आहे की नाही? असा सवाल रोहित पवार यांनी अन्य एका पोस्टमधून उपस्थित केला.