Rohit Pawar : भाजपने अजितदादांची ब्रँड व्हॅल्यू संपवली, रोहित पवारांचा टोला

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि राज्यात महविकास आघाडीचे 30 उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 8 खासदार या निवडणुकीत जिंकून आले. मात्र पक्ष फोडून बाहेर पडलेल्या अजित पवार गटाचा फक्त एकच खासदार निवडणून आला. तसेच 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपचे राज्यात आणि देशात मताधिक्य घटले आणि ते 300 चा आकडाही पार करू शकले नाहीत. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला टोला लगावत अजित पवार यांचे कान टोचले आहेत.

आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया अकाउंट X वरुन भाजपवर निशाणा साधला आहे. “अजितदादांसोबत जाऊन भाजपने ब्रँड व्हॅल्यू गमावल्याची टीका ऑर्गनायझरमधून केल्याचं वाचनात आलं. केवळ राज्यातच भाजपला अपयश मिळालं असतं तर ही टीका योग्य ठरली असती. पण भाजपची ब्रँड व्हॅल्यू ही लोकांनीच आणि संपूर्ण देशातच कमी केली. भाजपने अजितदादांची ब्रँड व्हॅल्यू संपवली हे मात्र वास्तव आहे आणि ज्या दिवशी ते भाजपसोबत गेले त्या दिवसापासून आम्ही हेच सांगत होतो. हे आज खरं होताना दिसत आहे. वापरायचं आणि फेकून द्यायचं ही भाजपची जुनी सवय आहे आणि लोकांनाही हे आता माहीत झाल्याचं या निवडणुकीत दिसून आलं”, असं रोहित पवार म्हणाले.