गुंडांना दिल्या जाणाऱ्या राजाश्रयामुळे पोलीसही सुरक्षित राहिलेले नाही, रोहीत पवार यांची टीका

पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून कायदा व सुव्यवस्थेते धिंडवडे उडाले आहेत. तेथील गुंडांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. रविवारी एका सराईत हल्लेखोरांनी थेट सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्क्दायक घटना घडली आहे. हल्लेखोराने कोयता फेकून मारल्यामुळे एपीआय रत्नदीप गायकवाड गंभीररीत्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहीत पवार यांनी सत्ताधारऱ्यांना फटकारले आहे.

”पुण्यात कोयता गँगने पोलीस अधिकाऱ्यावरच हल्ला केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कोयता गँग हद्दपार करण्याच्या बाता मारून शहरभर बॅनरबाजी करून घेणारे गृहमंत्री आता बोलतील का ? गुंडांना दिल्या जाणाऱ्या राजाश्रयामुळे जनताच काय पण जनतेचे रक्षक असलेले पोलीस देखील सुरक्षित राहिलेले नाहीत, हे महाराष्ट्राला शोभणारे नाही, सत्ताधाऱ्यांनी चिंतन करायला हवे…”, अशी टीका रोहीत पवार यांनी ट्विट करत केली आहे.

रोहीत पवार यांनी या ट्विट सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोयता गँग बाबतच्या दाव्याची देखील पोलखोल केली आहे. फडणवीस यांनी ‘हे कायद्याचे राज्य आहे, कोयत्याचं नाही’, असं जाहीर केलं होतं. त्याचं पोस्टरही रोहीत पवार यांनी शेअर करत फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

ससाणेनगर रेल्वे गेटजवळ रविवारी दुपारी चारच्या सुमारास वाहन अपघातामुळे दोन दुचाकीस्वारांची भांडणे सुरू झाली होती. त्यावेळी आरोपी  निहालसिंग मन्नूसिंग टाक आणि  राहुलसिंग उैर्फ राहुल्या याच्या मदतीने दुसऱ्या दुचाकीस्वारासोबत वाद घालत होता. त्यावेळी त्याच्या हातात कोयता असल्यामुळे परिसरातून जाणारे सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करीत आरोपी निहाल सिंग टाक याच्या हातातून कोयता काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी टाकने त्याच्याकडील कोयता एपीआय गायकवाड यांच्या अंगावर फेकून मारला. त्यामुळे गायकवाड यांच्या कपाळावर गंभीर इजा झाल्याने ते जखमी झाले आहेत.