रोहित शर्माचा मऱ्हाटी बाणा, मुंबईत राहता तर मराठी आलंच पाहिजे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘मुंबईत राहता तर मराठी आलंच पाहिजे,’ असा सणसणीत षटकार मारीत ‘हिटमॅन’ रोहित शर्माने आपला ‘मऱहाटी बाणा’ दाखवला. एका मराठी नाटकाच्या कलाकारांनी रोहित शर्माची भेट घेतली असता त्यांच्याशी संवाद साधताना रोहितने आपले ‘मराठी प्रेम’ व्यक्त केले.

‘थेट तुमच्या घरातून’ या मराठी नाटकाच्या टीमने रोहित शर्माची भेट घेतली. या वेळी रोहितने कलाकारांशी मराठीतून संवाद साधला. या वेळी अभिनेत्री नम्रता संभेराव हिने ‘आपण मराठीतून खूप छान बोलता’ असे म्हटले. यावर ‘मुंबईत राहता तर मराठी आलंच पाहिजे’ असे नम्रपणे रोहितने सांगितले. अभिनेता प्रसाद खांडेकर याने सोशल मीडियावर एक व्हिडीओच शेअर केला आहे. या व्हिडीओतील रोहितच्या भूमिकेचे जोरदार समर्थन केले जात आहे.

‘हिटमॅन’वर कौतुकाचा वर्षाव

मराठी कलाकारांना भेटताना रोहितने ‘नमस्कार’ म्हणत थेट मराठी बोलण्यास सुरुवात केली. ‘आम्ही तुमचे मराठीत बोलतानाचे व्हिडीओ नेहमी पाहतो’ असे या वेळी नम्रता संभेराव म्हणाली. यावर  रोहितने मी नेहमीच मराठी बोलतो, असे सांगितले. एकीकडे काही मराठीद्वेष्टय़ांकडून मराठीचा जाणीवपूर्वक अवमान केल्याचे प्रकार समोर येत असताना रोहित शर्माने मराठीवरील प्रेम व्यक्त केले असल्यामुळे सोशल मीडियात त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.