यंदाच्या दुलीप ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत रोहित शर्मा व विराट कोहली हे टीम इंडियाचे स्टार खेळाडू खेळताना दिसणार आहे. याआधी रोहित शर्मा 2016मध्ये, तर विराट कोहली 2010मध्ये दुलीप ट्रॉफीत खेळले होते. म्हणजेच रोहित 8 वर्षांनंतर, तर विराट 14 वर्षांनंतर दुलीप ट्रॉफीत खेळणार आहेत हे विशेष!
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार महिन्यांत हिंदुस्थानी संघाला 10 कसोटी सामने खेळायचे आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्व महत्त्वाचे खेळाडू दुलीप ट्रॉफीसाठी उपलब्ध असावेत, अशी ‘बीसीसीआय’चीच इच्छा आहे. हिंदुस्थानी संघ काही दिवसांपूर्वी श्रीलंका दौऱ्यावर होता, जिथे संघाला वनडे मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर आता संघ विश्रांती घेत असून बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज होणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी हिंदुस्थानी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली दुलीप ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहेत. ‘बीसीसीआय’ची वरिष्ठ निवड समिती दुलीप ट्रॉफीसाठी संघ निवडणार आहे. बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका पाहता सर्व खेळाडू दुलीप ट्रॉफीसाठी उपलब्ध असावेत, अशी वरिष्ठ निवड समितीची इच्छा आहे. हा हंगाम नव्या फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे.
हिंदुस्थानी क्रिकेट संघाला पुढील चार महिन्यांत ऑस्ट्रेलियात 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसह एकूण 10 कसोटी सामने खेळायचे आहेत. बांगलादेश मालिकेतील खेळपट्ट्या फिरकीपटूंना अनुकूल असतील अशी अपेक्षा आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुमराहला बांगलादेश मालिकेसाठी विश्रांती दिली जाऊ शकते. दुलीप ट्रॉफी पूर्वीसारखी विभागीय स्वरूपात होणार नाही. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या हिंदुस्थान ‘अ’, हिंदुस्थान ‘ब’, हिंदुस्थान ‘क’ आणि हिंदुस्थान ‘ड’ अशा चार संघांची निवड करेल. शुबमन गिल, केएल राहुल, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव यांनाही दुलीप ट्रॉफीमध्ये खेळण्यास सांगण्यात आले आहे.