माणसे दुःखी का होतात?

637

[email protected]

rokhthok

सत्य आणि सुखाची नक्की व्याख्या काय? हे आजपर्यंत कोणीच ठरवू शकले नाही. जगज्जेता अलेक्झांडरही सुखी नव्हता. सिंहासन आणि संपत्तीसाठी जे लढले ते कायम दुःखीच राहिले!

माणसे दुःखी का होतात? या प्रश्नाचे खरे उत्तर कुणाकडे नाही. सर्वकाही मिळवूनही माणसे दुःखीच राहतात. दिल्ली ही देशाची राजधानी. मोगलांचे राज्य येथे होते, पण दिल्लीच्या मातीत माणसांचे इतके रक्त झिरपले आहे की, या मातीशी माणसे एकरूप होत नाहीत. मोगल सम्राटांच्या पायाशी सगळी सुखे हात जोडून उभी होती. तरीही त्यांनी आपापसात लढाया केल्या. सिंहासनासाठी बापाने मुलाचा काटा काढला आणि मुलाने बापाला बंदिवान बनवले. सगळ्यांनाच सुखात जगता आले असते, पण तसे झाले नाही. भूक भागत नाही, हाव संपत नाही हे दुःखाचे मूळ आहे काय? तसे असेल तर ही भूक आणि हाव सर्वच क्षेत्रांत आहे. त्या अर्थाने मग अलेक्झांडर दि ग्रेट हा माणूस सुखी नव्हता, तर तो मानसिक रोगी होता. त्याच्याजवळ एक पागल स्वप्न होते. ते पागल स्वप्न प्रत्यक्षात आणण्यास पुरेसे कौशल्य त्याच्याजवळ होते. तरीही त्याचे स्वप्न पूर्ण झालेच नाही. कारण जसजसे ते स्वप्न पूर्ण होऊ लागले तसतसे ते विस्फारत जाऊ लागले व अपूर्ण होऊ लागले. जेव्हा इतिहासातील सर्व शूर माणसांपेक्षा अलेक्झांडर जास्त यशस्वी सम्राट आहे हे स्पष्ट झाले, तेव्हा त्याला आपण ईश्वर आहोत असे वाटू लागले. असा हा अलेक्झांडर सुखी होता का? त्याचा पराकोटीचा संताप, त्याचा स्त्रीद्वेष, त्याचा ईश्वरी भ्रम या सर्व गोष्टी सांगतात की, तो सुखी नव्हता.

दुःखाची व्याख्या
दुःखाची उत्तम व्याख्या रजनीश यांनी केली आहे. ते एका प्रवचनात सांगतात, जोपर्यंत आम्ही जीवनात आमूलाग्र बदल करीत नाही तोपर्यंत काहीही केले तरी दुःखमय जीवन दूर होणार नाही. ते दुःख काही बाहेरील अभावाचे कारण नाही. म्हणून सर्व अभाव नाहीसे झाले तरी ते कायमच असते. कदाचित आणखी वाढही होत असते. कारण त्यावेळी अभाव नाहीसे करण्याचे काम राहात नाही. त्यामुळे त्या दुःखाचे नग्न स्वरूप समोर येते. एकप्रकारची दारिद्रय़ता अशी आहे की, जी दारिद्रय़ता दिसते. पण एक आणखी गहिरी दारिद्रय़ता आहे जिचे दर्शन पूर्ण श्रीमंतीतही होते. जीवनातील दुःख कोणत्याही बाहेरच्या गोष्टीच्या अभावामुळे आलेले नसते. अभावामुळे कष्ट होतात. परंतु कष्ट म्हणजे दुःख नव्हे आणि म्हणून सारे कष्ट दूर झाले तरी दुःख नाहीसे होणार नाही.

दुःखाचा घेराव
एकदा एका राजाने काही विशेष प्रसंगानुसार १०० ब्राह्मणांना भोजन दिले. भोजनानंतर तो ब्राह्मणांना म्हणाला, ‘ज्ञानी लोकांचे एक उपनगर वसवावे अशी माझी इच्छा आहे. राजधानीच्या बाहेर सरोवराजवळ माझे हे रम्य वन आहे, तेथील जितकी जमीन तुम्ही १०० ब्राह्मण घेरू शकाल तितकी घ्या. जो जितकी जमीन घेरून टाकील व त्यावर आपली भिंत बांधील तितकी जमीन त्याचीच होईल.’ त्या ब्राह्मणांनी आपापल्या सामर्थ्याप्रमाणे ती जमीन घेरून टाकली. ती जमीन बहुमूल्य होती आणि ब्राह्मण दरिद्री होते. ज्यांच्याजवळ जे होते ते सर्व विकून त्यांनी जास्तीत जास्त जमीन घेरून त्यावर भिंती बांधल्या. भिंती बांधून जमीन घेरणे एवढेच मूल्य होते. नंतर सहा महिन्यांनी राजा तिथे गेला. तो ब्राह्मणांना म्हणाला, ‘तुम्ही पुष्कळ जमीन घेरून टाकली आहे. तरी पण फार जास्त जमीन घेरलेली नाही. आणखी जमीन घेरून घ्या. आणि हे लक्षात ठेवा की, ज्याचा घेरा सर्वांत मोठा असेल त्याला राजगुरूपद देण्याचा माझा संकल्प आहे.’ ज्याच्या समृद्धीचा घेरा सर्वांहून मोठा असेल तोच राजगुरू व्हावा हेही बरोबरच होते. राजाचा गुरू होण्याची ही मर्यादा येथे अनुकूलही होती. ते ब्राह्मण वेड्याप्रमाणे आपले घेरे मोठे करण्याच्या खटपटीस लागले. त्यांच्यात मोठी चढाओढ होती.

अशीच चढाओढ सर्व जगात आहे. सर्वजण आपापले घेरे मोठे करण्यात गुंतलेले आहेत. सर्वांचीच आकांक्षा राजगुरूपदावर प्रतिष्ठत होण्याची आहे. त्या ब्राह्मणांनी जास्तीत जास्त जमीन घेरून टाकली. आणखी सहा महिन्यांनी पुन्हा राजा तेथे गेला. त्यांना तो म्हणाला, ‘ब्राह्मणांनो, ज्याचा घेरा सर्वांत मोठा असेल त्याने तसे सूचित करावे.’ कोणी उठून उभा राहण्यापूर्वीच एक अत्यंत दरिद्री ब्राह्मण उठून उभा राहिला. त्याच्याजवळ नावाला वस्त्र म्हणून फक्त एक लंगोटीच होती. सर्वजण हैराण झाले. कारण सर्वांना माहीत होते की, त्याचाच घेरा सर्वांहून अगदी लहान आहे. तो तर भिंतीदेखील बांधू शकला नव्हता. गवत-काटक्यांची लहानशी वाडीच त्याने बांधली होती. तेवढेच त्याचे सामर्थ्य होते. परंतु तो अत्यंत दरिद्री ब्राह्मण म्हणाला, ‘मी माझे राजगुरूपद घोषित करीत आहे.’ राजा चकित झाला. त्याचे दारिद्र्य कोणास ठाऊक नव्हते? तो कदाचित वेडा झाला आहे, असे इतर ब्राह्मणांस वाटले. परंतु त्याने ज्याअर्थी दावा केला होता, त्याअर्थी राजास त्याच्या भूमीचे निरीक्षण करण्यास जाणे भाग पडले. जेव्हा राजा आणि इतर सर्व ब्राह्मण तिथे गेले तेव्हा त्यांना असे आढळले की, जो गवती काटक्याचा लहानसा घेरा होता तोही त्याने आदल्या रात्री जाळून टाकला होता आणि फक्त राख भिंतीच्या नावाने तिथे शिल्लक राहिली हाती. त्या ब्राह्मणाने म्हटले, ‘राजन, माझा घेरा सर्वांहून मोठा आहे. कारण माझा कोणताही घेराच नाही.’ हे ऐकून राजाने त्याचे पाय धरले. खरोखरीच ज्याचा कोणताही घेरा नसतो त्याने सर्वांनाच घेरलेले असते आणि जो सीमा तोडून टाकतो तो असीम होतो. सुख आणि दुःखाची व्याख्या यापर्यंत आहे. ज्याला ती समजली तो खरा सुखी.

रसेल काय म्हणतो
बर्ट्रेंड रसेल हा जगविख्यात तत्त्वचिंतक होता. त्याचे दीर्घ जीवन त्याने अर्थपूर्ण केले. त्याने सुखाची व्याख्या केली तशी दुःख म्हणजे काय, त्या भावनेलाही वाचा फोडली.

बेकायदेशीर आनंद…
श्वापदांना खायला भरपूर मिळाले आणि त्यांची तब्येत चांगली असली की ते आनंदी राहतात. माणसांनीसुद्धा असे आनंदी राहण्यास हरकत नाही. पण आमच्या या आधुनिक जगात माणसे, निदान बहुसंख्य माणसे आनंदी दिसत नाहीत. जर तुम्ही दुःखी असाल तर तुम्ही मान्य कराल की दुःख सहन करणारे तुम्ही एकटे नाही. पण तुम्ही सुखी व आनंदी असाल तर जरा स्वतःला विचारा की, तुमच्या मित्रांपैकी किती लोक आनंदी आहेत? जेव्हा तुमच्या मित्रांचा तुम्ही असा आढावा घ्याल तेव्हा लोकांच्या चेहऱ्यावरून त्यांची वृत्ती ओळखण्याची कला तुम्ही साध्य करून घेतलेली असेल! दिवसभरात जी माणसे भेटतात त्यांच्या वृत्तीला संवेदनक्षमतेने स्वीकारीत जा. ब्लेक म्हणतो – ‘मी पाहतो तो चेहरा दुर्बलतेने, दुःखाने भारावला आहे.’ दुःखाचे प्रकार अनेक असतील, पण कोणत्या तरी प्रकारचे दुःख सर्वत्र आहे. आधुनिक जगातील एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण शहर न्यूयॉर्क येथे तुम्ही गेले आहात अशी कल्पना करा. कामाच्या गर्दीच्या वेळी तुम्ही शहराच्या रस्त्यात उभे राहा किंवा सुट्टीच्या दिवशी मुख्य रस्त्यावर जा किंवा सुट्टीच्या दिवशी एखाद्या नृत्यरजनीत सहभागी व्हा. स्वतःला विसरा, स्वतःचे अस्तित्वच नाहीसे करा आणि तुमच्या सभोवती असलेल्या अनेक व्यक्तांत जरा समरस होण्याचा प्रयत्न करा. त्या इतर माणसांना तुमच्या वृत्तीचा क्रमाक्रमाने ताबा घेऊ द्या. तुम्हाला लवकरच दिसेल की, या सर्व माणसांना मोठ्या आश्चर्यकारक व अनेक अडचणी आहेत, दुःखे आहेत. कामाचे दडपण सांभाळीत जाणारी माणसे तुम्हाला चिंताग्रस्त झालेली दिसतील आणि जुनाट अपचनाचे ते बळी असतील. त्यांना त्यांच्याभोवती असलेला संघर्ष फक्त समजत असेल. इतर गोष्टीत त्यांना आस्था वाटेनाशी झाली असेल. कोणत्याही मोकळ्या क्रीडेचा त्यांना आनंद घेता येत नसेल आणि अनेक माणसांबरोबर काम करीत असतानाही त्यांना त्या इतर माणसांचे साधे भानही नसेल. सुट्ट्यांच्या दिवशी वेगळेच दृश्य दिसेल तुम्हाला. रस्त्यावर माणसांच्या झुंडी असतील. हळूहळू सरकावे लागत असेल. बाहेरून ही माणसे मोठी आरामशीर दिसतील, काही तर फारच श्रीमंत दिसतील आणि सर्व झुंबड कोणाच्या तरी मागे लागल्यासारखी पुढे सरकत असेल. हे लोक कुणाच्या मागे जात आहेत? सुख! हे सुख हस्तगत करायला निघाले आहेत. प्रचंड गर्दी. त्यावर लहान मोटारी अति मंद गतीने सरकत आहेत. मोटारींनी रस्ता एवढा भरला आहे की रस्ता दिसतच नाही किंवा मोटारीतील सधन माणसांना आजूबाजूचा निसर्ग पाहण्याचेही स्वातंत्र्य उरलेले नाही. कारण थोडे इकडेतिकडे बघा आणि अपघात झालाच म्हणून समजा! सर्व मोटारींतील सर्व श्रीमंत चालकांच्या मनात सध्या जणू एकच ध्येय उरलेले आहे. समोरच्या मोटारीच्या पुढे मी माझी मोटार कशी काढेन! पण हे कधीच जमत नाही. एवढी प्रचंड गर्दी असते. हा चमत्कारिक उद्योग जर क्षणभर विसरता आला – जी माणसे मोटारी चालवीत नाहीत, त्यांना असे विसरणे शक्य आहे – तर त्यांच्या वृत्ती कशा जाणवतात? भयंकर कंटाळलेल्या, लहानसहान असमाधानाने चिडलेल्या सुखाच्या मागे धावणाऱ्या या प्रचंड ताफ्यात एखादी अवखळ मोटार काळ्या लोकांनी भरून येते व आरडाओरडा करीत सर्वांच्या पुढे जाऊ लागते. त्यांचे ओरडणेही या थिजलेल्या ‘प्रगती’पेक्षा जास्त सजीव वाटते. पण ती ओरडणारी, आपला आनंद भडकपणाने व्यक्त करणारी मोटारही लवकरच एखाद्या अपघातात सापडणार असते आणि पोलिसांच्या ताब्यात जाणार असते! सुट्टीच्या दिवशी असा आनंद मिळविणे बेकायदेशीर आहे!

कृष्णमूर्तींचे भाष्य
एखादे पिकलेले फळ तोंडात पटकन पडावे तसे माणसाला अचानक व केवळ दैवाने सुख लाभत नसते हे उघड आहे. सुख ‘जिंकावे’ लागते. रसेल म्हणतो, या जगात अटळ आणि टाळता येण्यासारखी दुर्भाग्ये कितीतरी आहेत. तत्त्वचिंतक जे. कृष्णमूर्ती यांचे एक भाष्य देतो आणि विषय संपवतो. ‘‘ईश्वर आकाशात नसतो आणि भक्तगणांच्या पालखीतही तो नसतो. प्रत्येकाने स्वतःलाच ओळखावे व स्वतःचा उद्धार स्वतःच करावा!’’

दुःख निवारणासाठी व सुखाच्या शोधासाठी मंदिरांत व इतर प्रार्थनास्थळांत रांग लावणाऱ्यांना ते सांगतात, ‘‘सुखी होण्यासाठी आपण धर्म स्थापन करतो. त्या धर्माचे देव असतात. त्या देवांवर प्रेम करण्यासाठी आपण मंदिरे बांधतो. त्या मंदिराच्या अंधाऱ्या गाभाऱ्यात सत्य असत नाही. संघटित संस्थांच्या विद्युत रोषणाईने नटलेल्या भव्य सभागृहात ते असत नाही. ते सत्य ग्रंथात मिळत नाही. समारंभांतून हाती लागत नाही. सत्याचा शोध हा न संपणारा आहे आणि ते सत्य प्रत्येकाने शोधून काढायचे आहे!’’

सत्याचा शोध म्हणजे सुख. दुःख म्हणजे काय? ते यातून समजतं. सत्य आणि सुखाचा शोध संपणार नाही. कारण दुःख हेच सुखाचे मूळ आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या