रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानाविरोधात गुन्हा, प्रवाशाला मारहाण प्रकरण

कोकणकन्या एक्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानाने प्रवाशाला मारहाण करून त्याच्या पत्नीशी गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी त्या जवानाविरोधात छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

6 मे 2025 रोजी सनी भोसले हे त्यांची पत्नी व मुलीसह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मध्ये कोकणकन्या एक्प्रेसमध्ये चढले. मात्र रेल्वे सुरक्षा बलाचे जवान युवराज माळी यांनी त्यांना हटकले. त्यावरून वाद झाला. तेव्हा माळी यांनी सनी भोसले यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या पत्नी आणि लहान मुलीला धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. या मारहाणीत भोसले यांच्या पत्नीच्या हातातील बांगडी फुटून रक्त आले. तसेच माळी यांनी विनयभंग केल्याचा आरोप भोसले यांच्या पत्नीने केला. दरम्यान, कोकणकन्या एक्प्रेसमधून उतरल्यानंतर भोसले यांनी राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. हा गुन्हा सीएसएमटी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. याप्रकरणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे पोलीस अधिक तपास करीत आहेत.