
‘सहा जागा देतो म्हणून उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आम्हाला झुलवत ठेवले. सहा जागा तर दिल्याच नाहीत, दोन जागा दिल्या आणि त्यावर उमेदवारही त्यांनीच दिले. या उमेदवारांचा रिपाइंशी काहीही संबंध नाही. भाजपने आमचा विश्वासघात केला…’ असा शिमगा करत रिपाइं आठवले गटाने नांदेडात युती तुटल्याचे सांगितले.
नांदेड महापालिकेत भाजप आणि रिपाइं यांची युती होती. जागावाटपासाठी भाजपकडून खासदार अशोक चव्हाण हे पुढाकार घेऊन चर्चा करत होते. खासदार डॉ. अजित गोपछडे आणि अमर राजूरकर हेदेखील या चर्चेत सहभागी झाले होते. रिपाइंने तरोडा खुर्द, हनुमानगड, जयभीमनगर, शिवाजीनगर, इतवारा आणि वसरणी या सहा जागांची मागणी केली होती. त्यावर उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नुसतेच चर्चेचे गुऱहाळ चालले. त्यानंतर सहा जागा देता येणार नाहीत, असा निरोप भाजपकडून आला. इतवारा आणि सिडको वाघाळा या दोन जागा देण्याची तयारी दाखवली. त्याला रिपाइंने होकार दिला, मात्र उमेदवारी भरताना धनंजय कमलाकर जोंधळे आणि निरंजना राजू लांडगे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. या दोघांचा रिपाइंशी काडीचाही संबंध नसल्याचे रिपाइंचे राज्य संघटक विजय सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
रिपाइंने युती तोडली
भाजपने आमच्याशी चर्चा करून ऐनवेळी विश्वासघात केल्याचा आरोप विजय सोनवणे यांनी केला. महायुती स्थापन झाल्यापासून रिपाइं खंबीरपणे भाजपसोबत आहे. आमचे नेते रामदास आठवले यांनी सातत्याने महायुतीची बाजू लावून धरली आहे. परंतु जागावाटपात आमचा विश्वासघात करण्यात आल्याने महानगरपालिकेपुरती भाजपशी युती तुटल्याचेही सोनवणे यांनी स्पष्ट केले.


























































