
बांगलादेशातील सध्याची परिस्थितीचा तस्कर मोठ्या प्रमाणात गैरफायदा घेत असून हिंदुस्थान-बांगलादेश सीमेवर सोन्या-चांदीच्या तस्करीत वाढ झाली आहे. बीएसएफने दिलेल्या आकडेवारीनुसार, यावर्षी 31 ऑक्टोबरपर्यंत अवघ्या 10 महिन्यांत 172.528 किलो सोने आणि सुमारे 178 किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या सोन्या-चांदीची बाजारातील किंमत सुमारे 1300 कोटी रुपये इतकी आहे.
बांगलादेशात 5 ऑगस्ट नंतर निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेचा फायदा तस्कर घेत आहेत. मात्र, बीएसएफच्या सतर्कतेमुळे तस्करांचा प्रयत्न अयशस्वी होत आहे. बीएसएफकडून विविध ठिकाणांहून सातत्याने सोन्या-चांदीची तस्करी पकडली जात आहेत.
11,886 किलो ड्रग्जही जप्त
बीएसएफने हिंदुस्थान-बांगलादेश सीमेवर सुमारे 11,866 किलो ड्रग्ज जप्त केले. यासह सीमेवरून 32,65,700 रुपयांचे बनावट चलनही जप्त करण्यात आले आहे. अंमली पदार्थ, सोने-चांदी आणि बनावट नोटांच्या तस्करीप्रकरणी बीएसएफने आतापर्यंत 4168 जणांना अटक केली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा सोन्याची तस्करी वाढली आहे.