
बिहार विधानसभेसाठी दोन टप्प्यात झालेल्या निवडणुकीची शुक्रवारी मतमोजणी झाली आणि एनडीएने पाशवी बहुमत मिळवली. या एकतर्फी आणि अनपेक्षित निकालानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. निवडणुकीपूर्वी बिहारमधील महिलांच्या खात्यात 10 हजार रुपये टाकून अधिकृतपणे मते खरेदी केली गेली असा आरोप आता होत असून यासाठी थेट जागतिक बँकेचा निधीही वळवण्यात आल्याचा आरोप प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाने केला आहे. यामुळे बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांना 10 हजार रुपये देण्यासाठी जागतिक बँकेचा 14 हजार कोटी रुपयांचा निधी वळवण्यात आला. हा निधी विकास प्रकल्पांसाठी राखीव होता, मात्र त्याचा वापर निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी करण्यात आला, असा आरोप जनसुराज पक्षाचे उदय सिंह यांनी केला असून याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. ‘इंडिया टुडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
उदय सिंह यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत मोठा दावा केला. बिहार निवडणुकीचा निकाल विकत घेतला गेला असून हा जनादेश मिळवण्यासाठी 40 हजार कोटी रुपये खर्च करणअयात आले. जनतेच्या पैशाचा वापर करून एनडीएने लोकांचे मते विकत घेतली. यासाठी जागतिक बँकेकडून मिळालेला निधीही वापरण्यात आला, असा दावा उदय सिंह यांनी केला.
आचारसंहिता लागू होण्याच्या एक तास आधी जागतिक बँकेचे 14 हजार कोटी काढून राज्यातील 1.25 कोटी महिलांना वाटण्यात आले. बिहारवर सध्या 4.06 लाख कोटींचे कर्ज असून त्यावर दररोज 63 कोटी रुपयांच्या व्याजाचा भार पडत आहे, असे म्हणत बिहारची तिजोरी रिकामी असल्याचा आरोपही सिंह यांनी केला.
दरम्यान, निवडणूक रणनीतीकार म्हणून उदयाला आलेले आणि नंतर राजकारणी बनलेल्या प्रशांत किशोर यांनी स्थापन केलेल्या जनसुराज पक्षाला बिहार निवडणुकीमध्ये नोटा पेक्षाही कमी मते मिळाली. 238 मतदारसंघात निवडणूक लढवून त्यांना एकही जागा जिंकला आली नाही.



























































