ओव्हर कॉन्फिडन्सने केला घात; लोकसभा निवडणूक निकालावरून RSS ची BJP वर खरमरीत टीका

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका संबोधनात मणिपूरमधील हिंसाचारावरून केंद्रातील मोदी सरकारला खडे बोल सुनावले. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) आपल्या मुखपत्रातून भाजपला पुन्हा फटकारले आहे. अतिआत्मविश्वासात असलेले भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांसाठी लोकसभा निवडणुकीचा निकाल हा रिअ‍ॅलिटी चेक आहे. भाजप कार्यकर्ते आपल्या दुनियेत मग्न होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चकचकीत प्रतिमेत अंधळे झाले होते. यामुळे त्यांच्यापर्यंत सामान्यांचा आवाज पोहोचू शकला नाही, अशी टिप्पणी आरएसएसने आपले मुखपत्र Organiser मधून केली आहे.

आरएसएस भाजपची ‘फिल्ड फोर्स’ नाही. सोशल मीडियाच्या काळात प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता अथक परिश्रम करूनही अनुभवी स्वयंसेवकांकडे दुर्लक्ष केले गेले, हे या निवडणूक निकालावरून स्पष्ट होते, असे लेखात म्हटले आहे. आरएसएसचे सदस्य रतन शारदा यांनी हा लेख लिहिला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल हा भाजपचे नेते आणि अतिउत्साही कार्यकर्त्यांसाठी रिअ‍ॅलिटी चेक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 400 पारचा नारा हा आपल्यासाठी लक्ष्य आणि विरोधी पक्षांसाठी आव्हान होता आणि याची जाणीव भाजप कार्यकर्त्यांना अजिबात नव्हती, असे त्यांनी लेखात नमूद केले आहे.

निवडणुकीच्या आखाड्यात सोशल मीडियावर पोस्टर किंवा सेल्फी शेअर करून नव्हे तर मेहनत घेऊन लक्ष्य साध्य केले जाते. यामुळेच भाजप कार्यकर्ते आपल्या दुनियेत मग्न होते. पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेच्या जोरावर आनंद साजरा करत होते. यामुळे सामान्यांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचलाच नाही, असा टोला आरएसएसने लगावला आहे.

अजित पवार गटाला सोबत घेतल्याने सवाल

महाराष्ट्रात अनावश्यक राजकारणाचे एक प्रमुख उदाहरण आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचा एक गट भाजपसोबत आला. मात्र त्यावेळी भाजप आणि शिंदे गटाकडे बहुमत होते. तसेच अंतर्गत कलहामुळे पुढील दोन ते तीन वर्षांत शरद पवार यांचा प्रभाव संपला असता. एवढेच नव्हे तर भाजपने अशा काँग्रेस नेत्याचा पक्षात समावेश केला ज्याने 26/11 हल्ल्यावेळी ‘भगवा दहशतवाद’ म्हणत आरएसएसचा कट असल्याचा आरोप केला होता. आणि आरएसएसला ‘दहशतवादी संघटना’ असे म्हटले होते. यामुळे आरएसएसचे समर्थक नाराज झाले होते, असे लेखातून स्पष्ट करण्यात आले. पण काँग्रेसचा तो नेता कोण? त्याचे नाव लेखात उघड करण्यात आलेले नाही.

आरएसएसने भाजपचा प्रचार केला का?

आरएसएसने भाजपचा प्रचार केला का? असा प्रश्न कायम विचारला जातो. यावरही भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. आरएसएस ही भाजपची फिल्ड फोर्स नाही. भाजप जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे आणि त्यांचे आपले स्वतःचे कार्यकर्ते आहेत, असे रतन शारदा यांनी लेखात स्पष्ट केले आहे.