शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खासगी शाळांतील 25 टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी उद्या, 7 जून रोजी पुणे येथील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या सभागृहात शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱयांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता सोडत जाहीर करण्यात येणार आहे.
ऑनलाईन सोडतीचा निकाल 13 जून रोजी जाहीर केला जाणार आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल असून त्यावरील पुढील सुनावणी 12 जून रोजी होणार आहे. या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर लॉटरीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे पालकांना आरटीई प्रवेशासाठी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. उद्या होणाऱया सोडतीचे थेट प्रक्षेपण व्हीसीद्वारे करण्यात येणार आहे. पालकांना घरी बसून आरटीई प्रवेशाची सोडत ऑनलाईन पाहता येणार आहे.
न्यायालयाने आरटीई प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यापूर्वी शिक्षण विभागाने राबवलेल्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान सर्व माध्यमांच्या शाळांची आरटीई प्रवेशासाठी नोंदणी करून घेतली होती. तरीही काही शाळांनी आरटीईच्या जागांवर प्रवेश दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे न्यायालयाच्या सुनावणीनंतर याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.
राज्यातील 115 पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांना राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते गुरुवारी पोलीस शौर्य पदक, उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. 2021 च्या स्वातंत्र्य दिनी तसेच 2022 च्या प्रजासत्ताक दिनी जाहीर झालेली पोलीस पदके देण्यात आली. 30 पोलीस अधिकारी व जवानांना पोलीस शौर्य पदक, 7 पोलीस अधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक, 78 पोलीस अधिकारी व अंमलदारांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदके प्रदान करण्यात आली. यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर तसेच पोलीस अधिकारी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व गौरवण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱयांचे कुटुंबीय उपस्थित होते.