
>> रुचिरा सावंत
आज भारतात ठिकठिकाणी, अगदी खेडेगावातही अवकाशात जाण्याची स्वप्नं पाहणारे, अवकाश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन करू पाहणारे तरुण आणि शालेय विद्यार्थी हमखास दिसतात. वडिलांचं हेल्मेट डोक्यात घालून “मी अवकाशयात्री आहे” असं म्हणत गावभर हिंडणाऱया 5 वर्षांच्या चिमुरडीपासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत. पाककलेच्या सदराइतक्याच चवीने अवकाश विज्ञानाच्या जगातील बातम्या वाचणाऱ्या गृहिणींपर्यंत… अवकाश विज्ञानाची स्वप्ने वाच चालली आहेत.
जून 25, 2025 ही तारीख भारतीय अवकाश विज्ञानाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवली गेली. पहिले भारतीय अवकाशयात्री विंग कमांडर राकेश शर्मा यांच्या 3 एप्रिल 1984 रोजी झालेल्या ऐतिहासिक अवकाश प्रवासानंतर 40 वर्षांनी 25 जून 2025 रोजी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी अवकाशात झेप घेतली. यासोबतच ते अवकाशातील दुसरे भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय अवकाशयात्री ठरले.
1962 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ‘जे.एफ. केनेडी’ यांनी ‘वुई चूज टू गो टू मून’ अशा शीर्षकाचे एक भाषण केले आणि केवळ राजकीय व वैज्ञानिक वर्तुळातच नव्हे, तर सामान्य माणसांमध्येसुद्धा उत्साहाची एक लाट आली. जुलै 2025 मध्ये म्हणजे अगदी याच महिन्यात मानवाने चंद्रावर पहिलं पाऊल ठेवल्याच्या घटनेला 56 वर्षे पूर्ण झाली. केनेडी यांच्या भाषणाचा परिणाम म्हणून अवकाशात जाण्याचं स्वप्नं पाहणाऱया मेलडी नामक एका छान चुणचुणीत मुलीची गोष्ट सांगणारा ‘अॅन अमेरिकन गर्ल स्टोरी ः मेलडी 1963’ हा एक छान सिनेमा आहे. 1963 मध्ये घडणाऱया त्या गोष्टीमध्ये 10 वर्षांची ही गुणी आणि जगाविषयी प्रचंड कुतूहल असणारी मुलगी स्वतसाठी स्पेस सूट व एक हेल्मेट घेऊन फिरत असते. अवकाशात जाण्याचं स्वप्नं पाहते आणि फॅन्सी ड्रेसला अवकाशयात्री होते. भारतामध्ये असंच काहीसं पुसटसं दृश्य दिसू लागलं ते कल्पना चावला अवकाशयात्री झाली तेव्हा, पण याला खऱया अर्थाने प्रोत्साहन मिळालं ते भारताच्या यशस्वी चांद्र मोहिमांनंतर आणि ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या यशस्वी अवकाश मोहिमेनंतर तर त्याला एक वेगळीच झलक प्राप्त झाली आहे.
आज भारतात ठिकठिकाणी, अगदी खेडेगावातही अवकाशात जाण्याची स्वप्नं पाहणारे, अवकाश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन करू पाहणारे तरुण आणि शालेय विद्यार्थी हमखास दिसतात. वडिलांचं हेल्मेट डोक्यात घालून “मी अवकाशयात्री आहे” असं म्हणत गावभर हिंडणाऱया 5 वर्षांच्या चिमुरडीपासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत. गृहिणी ते संध्याकाळी कट्टय़ावर भारताचं अवकाश धोरण या विषयावर चर्चा करणारे ज्येष्ठ… हे सगळं भारतीय अवकाश कार्यक्रमाच्या अनेक वर्षांच्या जडणघडणीचे हे फलित आहे.
भारतीय अवकाश कार्यक्रमाच्या आखणीसाठी कोणत्याही राजकीय किंवा लष्करी उद्दिष्टांमुळे प्रेरणा घेतलेली नाही. देशातील भूभौतिक शास्त्राचा, खगोल भौतिकशास्त्राचा व अवकाश विज्ञानाचा अभ्यास करणाऱया वैज्ञानिकांचं कुतूहल आणि सामाजिक जाणीव यामागे आहे. स्पुटनिक इरासारख्या अतिशय स्पर्धात्मक काळातही डॉ. विक्रम साराभाई आणि डॉ. होमी भाभा यांसारख्या द्रष्टय़ा वैज्ञानिकांनी स्पर्धेचा भाग होण्याचा मोह टाळून सर्वसामान्य जनतेच्या समस्यांचं निवारण करण्याच्या उद्देशाने ‘सर्वसामान्य भारतीयांसाठी, त्यांच्या फायद्यासाठी अवकाश विज्ञान’ ही संकल्पना राबविण्यासाठी राष्ट्रीय सहकार्याची मागणी केली आणि तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी वैज्ञानिकांच्या दूरदृष्टीवर विश्वास ठेवला. भारतीय अवकाश विज्ञान कार्यक्रमाचा आजवरचा प्रवास कायमच सर्वसामान्य भारतीयाला केंद्रस्थानी ठेवून वास्तविकता आणि व्यावहारिकतेच्या मजबूत पायावर उभारला आहे.
इस्रोचे भूतपूर्व अध्यक्ष डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या सोबत संवाद साधताना ‘सामान्य माणसासाठी अवकाश विज्ञान ते परग्रह मोहिमा या स्थित्यंतराकडे कसं पाहावं?’ असा प्रश्न मी त्यांना विचारला होता. उत्तरादाखल त्यांनी फार सोपी गोष्ट मला सांगितली. ते म्हणाले, “खऱया अर्थाने काळाशी सुसंगत असणं म्हणजे भविष्याचा विचार करून कालानुरूप व परिस्थितीनुरूप सुसंगत असणं होय… आणि त्यासाठी भारताने परग्रह मोहीम, मानवी मोहिमांवर लक्ष केंद्रित करणं हे आपल्या संस्था सुरू करतानाच्या ध्येयापासून दूर जाणं नसून याउलट तेच खऱया अर्थाने आपल्या ध्येयाला जपण्यासाठी आवश्यक आहे.” या अर्थाने भारत कायमच काळाशी आणि भविष्याशी सुसंगत राहिला आहे. हे सारं पाहून भारतीय अवकाश मोहिमांचे आशादायी भविष्य जाणवते.
(लेखिका मेकशिफ्टच्या सहसंस्थापिका आणि विज्ञान संवादक आहेत.)
भारतीय अवकाश कार्यक्रमाचा प्रवास
(1) प्रूफ ऑफ कन्सेप्ट फेज ः परदेशी बनावटीची उपलब्ध उपकरणं, तंत्रज्ञान व प्रणाली वापरून आपलं मूळ उद्दिष्ट – ‘सर्वसामान्यांसाठी, त्यांच्या फायद्यासाठी अवकाश विज्ञान’ हे ब्रीद साध्य करून दाखवणं.
(2) एक्सपरिमेंटल फेज ः प्रयोगाचा आणि क्षमता वृद्धीचा टप्पा.
(3) ऑपरेशनल फेज ः नवीन प्रणालींची निर्मिती आणि त्यासाठीची धोरणे. भारतीय तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रयत्न.