जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची चर्चा, नंतर नकार; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद सोडले?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्याच्या बातम्या आज दिवसभर टीव्ही वाहिन्या आणि समाजमाध्यमांवर फिरत होत्या. पण जयंत पाटील यांच्या राजीनाम्याच्या बातम्या निव्वळ खोडसाळपणा असल्याचे पक्षाच्या वतीने ‘एक्स’वरून स्पष्ट करण्यात आले त्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच या पदाचा कार्यभार सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची बातमी पसरली. जयंत पाटील यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आपला राजीनामा काही दिवसांपूर्वी सोपविला असून त्यांच्या ऐवजी नवनेतृत्वाला संधी दिली जाईल, अशी जोरदार चर्चा माध्यमात सुरू झाली. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर विधान परिषद सदस्य शशिकांत शिंदे हे नवे प्रदेशाध्यक्ष होणार अशाही बातम्या सुरू झाल्या.

अखेर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी याप्रकरणी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टनंतर दिवसभर सुरू असलेल्या या चर्चेला पूर्णविराम मिळाला. जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या प्रसारित होणे हा निव्वळ खोडसाळपणा आहे. पक्ष हा एक नियमानुसार अन् शिस्तीनुसार चालत असतो, असे त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.

या चर्चेवर आमदार रोहित पवार यावर भूमिका अधिक स्पष्ट केली. प्रदेशाध्यक्ष पदाबाबत अजून नाव निश्चित नाही. येत्या 15 जुलैला शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षाची बैठक आहे. या बैठकीत निर्णय होईल.