सिद्धरमय्या बंडाच्या तयारीत ? येडीयुरप्पांसोबत बैठक झाल्याच्या चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, बंगळुरू

कर्नाटकमधली राजकीय अस्थिरता अद्यापही संपली नसून तिथे नव्याने राजकीय घडामोडी सुरू झाल्याचं बोललं जातंय. सिद्धरमय्या यांनी कर्नाटकात बंड पुकारण्याची तयारी सुरू केल्याची जोरात चर्चा सुरू आहे. कुमारस्वामी यांच्या सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर हे बंड सुरू होईल असं सांगितलं जातंय.

एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार कुमारस्वामी हे जेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहायला गेले होते तेव्हा त्यांनी त्यांच्या खास समर्थकांसोबत चर्चा केली होती. या बैठकीमधला मुख्य विषय हा सिद्धरमय्या आणि बी.एस.येडीयुरप्पा या दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या भेटीचा होता असं या वर्तमानपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे.

अशी चर्चा आहे की सिद्धरमय्या त्यांच्या समर्थकांना १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर राजीनामा द्यायला सांगतील ज्यामुळे सरकार पडेल. याचा फायदा उचलत येडीयुरप्पा यांना पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्यासाठी संधी मिळेल. सध्या भाजपकडे १०४ आमदार आहेत. काँग्रेस आणि जेडीएसचे ११२ आमदार असल्याने त्यांना सरकार स्थापन करता आले होते. सिद्धरमय्या समर्थक आमदारांची संख्या ही १७ असून त्यांनी राजीनामा दिल्यास काँग्रेस आणि जेडीएस आघाडीचे आमदार आपोआप कमी होतील. २ जागा या रिक्त आहेत त्यामुळे भाजपला कर्नाटकात सत्तास्थापनेसाठी  परिस्थिती अनुकूल बनेल. कुमारस्वामी यांना या संभाव्य बंडाची कल्पना आली असून त्यांनी सिद्धरमय्यांनी बंड पुकारल्यास भाजपचे आमदार फोडण्याची तयारी ठेवली आहे.