
भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षापदावरून हकालपट्टी झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकणकर यांना तत्काळ राजीनामा देण्याचे आदेश दिले. त्यानंतर रात्री उशिरा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची देवगिरी निवासस्थानी भेट घेत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरूनही त्यांची गच्छंती अटळ आहे. दरम्यान, आणखी काही नेते फडणवीसांच्या रडारवर असल्याची चर्चा आहे.
राजकीय नेत्यांचा बहुचर्चित ज्योतिषी भोंदूबाबा कॅप्टन खरात याने शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे उघडकीस आले आहे. भोंदूबाबा खरातसोबत रुपाली चाकणकरांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी चाकणकर यांना ‘वर्षा’ निवासस्थानी बोलावून घेतले. त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर फडणवीस यांनी चाकणकर यांना तत्काळ राजीनामा देण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महिलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेला भोंदूबाबा अशोक खरात सोबत रुपाली चाकणकरांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. तसेच चाकणकर या खरात याच्या श्री शिवनिका या संस्थेच्या विश्वस्तही असल्याचे समोर आले आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार गट चांगलाच अडणीत आला आहे. मुख्यमंत्र्यांनी चाकणकर यांचा महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्ष पदावरूनही चाकणकर यांची गच्छंती अटळ आहे. एक दोन दिवसात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून चाकणकर यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, खरातसोबत अनेकांचे फोटो आहेत. फक्त महिला म्हणून माझ्यावर आरोप करण्यात आले, असे चाकणकर राजीनाम्यानंतर म्हणाल्या.
पहिला राजकीय झटका
राजकीय नेत्यांशी जवळीक असणाऱ्या कॅप्टन खरात प्रकरणात दोन आठवड्यांपूर्वीच मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष घालत थेट पोलीस महासंचालकांना कारवाईचे आदेश देत भोंदूबाबा कॅप्टन खरात याच्याभोवती फास आवळण्यास सुरुवात केली. खरात याच्या अटकेनंतर अखेर आज पहिली विकेट पडली असून महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांना पदावरून दूर करत फडणवीसांनी राजकीय झटका दिला आहे. या प्रकरणात आणखीन काही राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
महायुती सरकारमध्ये खळबळ
खरात याचे अनेक कारनामे एकामागून एक उघडकीस येऊ लागल्याने महायुतीमध्ये खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह अर्धा डझन मंत्र्यांची भोंदूबाबा खरात याच्याशी सलगी असल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस अॅक्शन मोडवर आल्यामुळे अनेकांचे टेन्शन वाढले आहे.
खरातचे आक्षेपार्ह व्हिडीओ बाहेर काढणारा नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात
कॅप्टन खरात याच्या कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात नीरज जाधव हा शिपाई होता. खरातशी बिनसल्याने त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते. जाधवने खरातच्या केबिनमधील सीसीटीव्हीतील अश्लिल व्हिडीओ स्वतःकडे पेनड्राइव्हमध्ये ठेवले होते. त्याच्याकडून पैसे उकळण्यासाठी काही पीडित महिलांना धमकावले होते. खरातच्या सांगण्यावरून जाधव व त्याच्या एका साथीदाराविरुद्ध शिर्डी आणि वावी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, एसआयटीने जाधवला ताब्यात घेऊन शंभरहून अधिक अश्लिल व्हिडीओ हस्तगत केल्याचे समजते.






























































