
हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेसाठी आजचा दिवस अत्यंत चिंतेचा ठरला आहे. जागतिक बाजारातील तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे भारतीय रुपयाने (INR) अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ९५ चा टप्पा ओलांडला आहे. सोमवारी सकाळी व्यवहार सुरू झाल्यानंतर रुपया काही काळ सावरला होता, मात्र दुपारपर्यंत तो ९५.२० या ऐतिहासिक नीचांकी पातळीला पोहोचला.
घसरणाऱ्या रुपयाला सावरण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) गेल्या शुक्रवारी बँकांच्या परकीय चलन व्यवहारांवर (Net Open Position) मर्यादा आणण्याचे मोठे पाऊल उचलले होते. यामुळे आज सकाळी रुपया १२८ पैशांनी वधारून ९३.५७ वर आला होता. मात्र, ही सुधारणा फार काळ टिकली नाही आणि जागतिक दबावामुळे रुपया पुन्हा घसरला
अमेरिका, इराण आणि इस्रायलमधील वाढत्या संघर्षामुळे जागतिक गुंतवणूकदार धास्तावले आहेत. सुरक्षित गुंतवणूक म्हणून डॉलरला मोठी मागणी येत आहे. ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती प्रति बॅरल ११५ डॉलरच्या वर गेल्या आहेत. हिंदुस्थान आपली गरज भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणात तेल आयात करतो, त्यासाठी डॉलरमध्ये पैसे मोजावे लागत असल्याने रुपयावर दबाव वाढला आहे. मार्च महिन्यात परकीय गुंतवणूकदारांनी हिंदुस्थानी शेअर बाजारातून जवळपास ११ अब्ज डॉलर्स काढून घेतले आहेत. रुपयाच्या घसरणीसोबतच मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स आणि निफ्टीमध्येही मोठी घसरण पाहायला मिळाली.





























































