नवी मुंबई पालिकेच्या सीबीएसई शाळांमध्ये प्रवेशासाठी झुंबड, महागड्या इंग्रजी शाळांना चपराक

48

सामना ऑनलाईन । नवी मुंबई 

नवी मुंबई महापालिकेने शहरात दोन ठिकाणी सुरू केलेल्या सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली आहे. या दोन्ही शाळांसमोर प्रवेशासाठी विद्यार्थी आणि पालकांच्या मोठमोठय़ा रांगा लागल्या असून दोन दिवसांत 400 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. पालिकेच्या या उपक्रमाला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे शहरात शिक्षणाचा कॉर्पोरेट व्यवसाय करणाऱया इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांचे धाबे दणाणले आहेत.

सीबीएसई बोर्डाच्या खासगी शाळांमधील शिक्षण खर्चिक आहे. त्यामुळे सर्वसामान्य पालकांना या शाळेत आपल्या मुलांचा प्रवेश घेताना मोठा आर्थिक ताण सहन करावा लागतो. मुलांना खासगी शाळांच्या धर्तीवर चांगले शिक्षण मिळावे यासाठी नवी मुंबई महापालिकेने कोपरखैरणे येथील सेक्टर 11 मध्ये आणि नेरुळ, सीवूड येथील सेक्टर 50 मध्ये सीबीएसई बोर्डाच्या दोन शाळा सुरू केल्या आहेत. 2019-20 या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया या दोन्ही शाळांमध्ये सुरू झाली असून ती येत्या 31 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

फीचा फेरविचार करण्याची वेळ
नवी मुंबईतील अनेक खासगी शाळा पालकांकडून मनमानी पद्धतीने फीची वसुली करतात. शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांच्या नावाखाली वर्षभर ‘व्यवसाय’ सुरू असतो. मात्र महापालिकेने दोन सीबीएसई शाळा सुरू केल्यामुळे या मनमानी करणाऱया खासगी शाळांवर फीचा फेरविचार करण्याची वेळ ओढावली आहे.

मोफत शिक्षण
महापालिकेच्या दोन्ही सीबीएसई शाळांमध्ये प्रवेश घेणाऱया विद्यार्थ्यांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. सर्व खर्च महापालिकेच्या माध्यमातून केला जाणार आहे. नर्सरी ते इयत्ता पहिलीचे वर्ग पुढील शैक्षणिक वर्षात सुरू होणार असून त्यानंतर प्रत्येक वर्षी पुढील वर्ग सुरू करण्यात येतील.

आपली प्रतिक्रिया द्या