
नववर्षाच्या निमित्ताने रशियन सैनिकांना उद्देशून दिलेल्या संदेशात पुतिन यांनी त्यांना देशाचे खरे नायक संबोधले. रशियाला आपल्या लढवय्यांवर पूर्ण विश्वास असून, त्यांच्या शौर्यामुळेच अखेर विजय मिळेल, असे पुतिन म्हणाले. हा संदेश रशियाच्या सुदूर पूर्वेकडील कमचटका प्रांतातून सर्वप्रथम प्रसारित करण्यात आला. आपल्या भाषणात त्यांनी युद्धावर अधिक भर देत सैनिकांच्या त्यागाचे कौतुक केले.
रशिया-युक्रेन युद्ध नववर्षातही थांबण्याची चिन्हे नसताना, दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी नववर्षाच्या संदेशातून आपापली ठाम भूमिका मांडली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेन युद्धात अंतिम विजय रशियाचाच होईल, असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. तर, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी युद्धाचा अंत हवा असल्याचे स्पष्ट करत कोणत्याही परिस्थितीत कमकुवत किंवा अपमानास्पद समझोता स्वीकारला जाणार नसल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, झेलेन्स्की यांनी युक्रेन शांतता इच्छित असल्याचे ठामपणे सांगितले. मात्र, देशाच्या सार्वभौमत्वाशी तडजोड करणारा किंवा युक्रेनला कमकुवत करणारा कोणताही करार स्वीकारला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. अमेरिका आणि युरोपीय सहयोगी देशांच्या माध्यमातून शांतता चर्चेचे प्रयत्न सुरू असून, या चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे संकेत दिले जात आहेत.
या युद्धामुळे दोन्ही देशांना मोठी किंमत मोजावी लागली आहे. हजारो सैनिकांचा मृत्यू झाला असून, लाखो युक्रेनियन नागरिकांना आपली घरे सोडून विस्थापित व्हावे लागले आहे. दोन्ही बाजू आपापल्या अटींवर ठाम राहिल्याने शांततेचा मार्ग अद्याप कठीणच असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, पुतिन यांनी त्यांच्या निवासस्थानी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाल्याच्या आरोपांवर आपल्या भाषणात कोणताही उल्लेख केला नाही. युक्रेनने हे आरोप फेटाळले असून, युरोपीय संघाने मात्र रशियावर शांतता चर्चेला अडथळे निर्माण केल्याचा आरोप केला आहे.























































