आता चर्चा फक्त पाकव्याप्त कश्मीर ताब्यात घेण्यावरच होईल, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केले स्पष्ट

 

चर्चा होणार असेल तर ती केवळ दहशतवाद आणि पाकव्याप्त कश्मीरवरच होईल, अशा शब्दांत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज पुन्हा एकदा पाकिस्तानला ठणकावले. तसेच दोन्ही देशांमधील चर्चेत तिसऱया पक्षाचा हस्तक्षेप कुठल्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट करत अमेरिकेला इशारा दिला. दिल्लीतील होंडुरास दूतावासाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

पाकिस्तानशी आमचे संबंध आणि कुठलेही व्यवहार पूर्णपणे द्विपक्षीयच असतील. वर्षानुवर्षे असेच सुरू असून त्यात कोणताही बदल झालेला नाही, असेही परराष्ट्रमंत्री म्हणाले. शस्त्रसंधीनंतरही पाकिस्तानी सैन्याकडून सातत्याने एलओसीवर गोळीबार सुरू होता. क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले सुरू होते. त्याला हिंदुस्थानी लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले. याबाबत बोलताना ते म्हणाले, दहशवाद्यांच्या पायाभूत सुविधा नष्ट करून आम्ही ठरवलेले ध्येय साध्य केले. आमची भूमिका योग्यच होती. आम्ही सैन्यावर नव्हे तर दहशतवाद्यांच्या पायाभूत सुविधांवर हल्ले करत आहोत, त्यांचे तळ उद्ध्वस्त करत आहोत, असा संदेश आम्ही पाकिस्तानी सैन्याला पाठवला. या कारवाईत हस्तक्षेप न करण्याचा पर्याय त्यांच्याकडे होता, परंतु त्यांनी तो ऐकला नाही. 10 मे रोजी सकाळी त्यांच्या निर्णयाचा त्यांना मोठा फटका बसला. त्यांचे किती नुकसान झाले हे उपग्रह छायाचित्रांवरून दिसून आले. तसेच शस्त्रसंधी करण्यासाठी कुणी गुडघे टेकले हेदेखील दिसते, असे परराष्ट्र मंत्री म्हणाले.

सिंधू जलकरार स्थगितच

सिंधू जल करार स्थगितच राहणार आहे. जोपर्यंत पाकिस्तानकडून दहशतवादाला खतपाणी घालणे पूर्णपणे थांबत नाही तोपर्यंत सिंधू जल करार स्थगितच राहील, असे जयशंकर म्हणाले. कश्मीरवर चर्चा करण्यासाठी आता एकमेव गोष्ट म्हणजे पाकिस्तानने पाकव्याप्त कश्मीरमधील बेकायदेशीरपणे व्यापलेला हिंदुस्थानी भूभाग रिकामा करणे आणि आम्ही त्या चर्चेसाठी कायम तयार आहोत, असेही जयशंकर म्हणाले.

सिंधू जल करारावर चर्चेसाठी पाकिस्तान तयार

‘ऑपरेशन सिंदूर’ने बिथरलेल्या पाकिस्तानने आता सिंधू जल करारावर चर्चेची तयारी दर्शवली आहे. सिंधू जल करार स्थगित करण्यावर पुनर्विचार करण्याची मागणी पाकिस्तानने निवेदनाद्वारे केली आहे. सिंधू जल करारांतर्गत पाकिस्तानच्या भागात अधिक पाणी जात आहे. याबाबत हिंदुस्थान दीर्घकाळापासून पाकिस्तानकडे चर्चेची मागणी करत आहे, परंतु पाकिस्तान त्यासाठी तयार झाला नाही. आता पाकिस्तानला जोरदार दणका दिल्यानंतर याप्रकरणी चर्चेची तयारी पाकिस्तानने दर्शवली आहे.