
अजित पवार हे ‘दादा’च होते. हे दादा पर्व अकाली संपले. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख, आर. आर. पाटील अशी उमदी व तरुण मंडळी महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणातून निघून गेली. जणू महाराष्ट्राच्या मराठी राजकारणाला कोणाची दृष्टच लागली. महाराष्ट्राने पुन्हा एकदा एक कर्तबगार आणि खंबीर नेता गमावला आहे. अजित पवार यांच्यासारखा नेता राजकारणात नसणे म्हणजे महाराष्ट्राचे राजकारण बेचव होणे, मंद होणे आणि दिशाहीन होण्यासारखे आहे. अजित पवारांच्या जिवावर आणि नावावर राजकारण करणारा एक मोठा वर्ग या क्षणी अनाथ व पोरका झाला आहे. महाराष्ट्रातल्या राजकारणातले एक जिद्दी आणि हिंमतबाज व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. अजित पवारांच्या असंख्य आठवणी मागे राहिल्या आहेत.
काही व्यक्ती अशा असतात की त्यांच्या अंगी नेतृत्वाचे गुण उपजतच असतात. अजित पवार हे त्यातील एक. शरद पवार यांच्या सावलीतही त्यांनी स्वतःचे नेतृत्व सिद्ध केले. पण मृत्यू अविचारी बनला व त्याने महाराष्ट्राचे हे उमदे आणि दिलदार नेतृत्व आपल्यातून हिरावून नेले. अजित पवार यांचे विमान बारामतीत कोसळले व त्यात त्यांचे निधन झाल्याच्या बातमीने महाराष्ट्र सुन्न झाला. पवार यांच्या चाहत्यांवरच नव्हे तर राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. अजितदादांच्या पायाला भिंगरीच होती व ते सतत फिरत आणि दौऱ्यावर असायचे. आता ते अशा दौऱ्यावर गेले की पुन्हा परत येणार नाहीत. अजित पवारांचे अचानक जाणे म्हणजे महाराष्ट्राच्या समाजकारणात, राजकारणात, लाखोंच्या व्यक्तिगत जीवनात पोकळी निर्माण झाल्यासारखेच आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात ते शरद पवारांचे पुतणे म्हणून आले. पवारांसारख्या सह्य़ाद्रीच्या सावलीत वावरून त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले व आपल्या कर्तृत्वाने त्यांनी स्वतःची वेगळी वाट निर्माण केली. त्यांचा आताचा प्रवास शरद पवारांपासून वेगळा होता. शरद पवार यांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ‘काकां’च्या डोळ्यासमोर अजितदादांनी 40 आमदारांसह उचलून नेला व भाजपबरोबर सत्तेत सामील झाले. पण शरद पवार व कुटुंबाशी त्यांची नाळ कायम राहिली. कालच्या महानगरपालिका निवडणुकीत शरद पवार, अजित पवारांचे पक्ष एकत्र येऊन लढले. जिल्हा परिषद निवडणुकाही ते एकत्रच लढणार होते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठीच दादा बारामतीस निघाले होते. पण त्यांच्या प्रिय बारामतीच्या कुशीत विमान कोसळून दादा कायमचे विसावले. अजित पवार यांना शरद पवारांचा
वारसा
लाभला. शरद पवार अजित दादांच्या मागे उभे राहिले. मात्र स्वतः अजित पवार यांच्यात प्रचंड कष्ट करण्याची मानसिकता होती. ते 6 वेळा उपमुख्यमंत्री झाले. काटेवाडीतील सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी सार्वजनिक जीवनाचा आरंभ केला. काटेवाडीतील सहकारी सोसायट्यांपासून ते राज्य सहकारी बँक, खासदार, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री अशी त्यांनी भरारी घेतली. पृथ्वीराज चव्हाण, विलासराव देशमुख, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री म्हणून येत-जात राहिले, पण त्या सगळ्यांच्या मंत्रिमंडळात अजितदादा उपमुख्यमंत्री म्हणून कायम राहिले. ते चतुर राजकारणी होते. 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप स्वतः पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्यावर लावले, पण अजितदादांचे चातुर्य असे की, महिनाभरात त्याच मोदी पक्षाच्या महाराष्ट्र सरकारात ते उपमुख्यमंत्री झाले. एकदा भल्या पहाटे त्यांनी फडणवीसांबरोबर शपथ घेतली. 35 तासांसाठी उपमुख्यमंत्री बनले व आपल्या विरुद्धच्या सर्व चौकशा बंद करण्याचा आदेश जारी करून ते पुन्हा स्वगृही परतले व उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात सामील झाले. अजित पवार हे राजकारणात खूप मोठे झाले. तरीही शरद पवारांचे पुतणे, पवारांचे खरे वारसदार म्हणूनच लोक त्यांना ओळखत होते. अजित पवारांनी सत्ता, संपत्तीचा यथेच्छ लाभ घेतला. मंत्रीपद नसले तरी विरोधात बसून त्यांनी वचक ठेवला. प्रशासनाकडून कामे करून घेण्याचे कसब त्यांच्याकडे होते. भाषण करताना टाळ्या मिळवण्याच्या नादात ते अनेकदा वाहत गेले. त्याचे परिणामही त्यांना भोगावे लागले. परंतु अलीकडील काही वर्षांत वागण्या-बोलण्यात ते संयम बाळगत होते. मंत्री म्हणून
निर्णय घेण्याची क्षमता
त्यांच्यात होती. ते निर्णय घेऊन मोकळे होत आणि यशस्वीपणे कृतीत उतरवून दाखवत. राजकारणात स्पष्ट, परखड बोलणारे नेते म्हणून अजित पवार नामवंत होते. वेळेची शिस्त, स्वच्छता व टापटीपपणा त्यांना प्रिय होता. फालतू आश्वासन देणे त्यांच्या कामाच्या शैलीत बसत नव्हते. ‘तू कसा निवडून येतो ते बघतो’ अशी भाषा ते वापरत व अनेकदा त्यांनी ते करूनही दाखविले. भाजपच्या नादाला ते लागले व बहीण सुप्रिया सुळेंच्या विरोधात पत्नीला लोकसभेसाठी उभे केले. बारामतीकरांनी त्यांचा हा डाव उधळून लावला. पण विधानसभेला त्याच बारामतीकरांनी अजित पवारांना विक्रमी मताधिक्यांनी निवडून दिले. अजित पवार हे सध्याच्या राजकारणातील एक छत्र होते. त्या छत्राखाली हजारो लोक उभे होते. हे छत्र कोसळले, त्यामुळे अजित पवारांवर अवलंबून असलेल्या लोकांचे भविष्य अंधःकारमय झाले. अजित पवार हे ‘दादा’च होते. हे दादा पर्व अकाली संपले. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख, आर. आर. पाटील अशी उमदी व तरुण मंडळी महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणातून निघून गेली. जणू महाराष्ट्राच्या मराठी राजकारणाला कोणाची दृष्टच लागली. महाराष्ट्राने पुन्हा एकदा एक कर्तबगार आणि खंबीर नेता गमावला आहे. अजित पवार यांच्यासारखा नेता राजकारणात नसणे म्हणजे महाराष्ट्राचे राजकारण बेचव होणे, मंद होणे आणि दिशाहीन होण्यासारखे आहे. अजित पवारांच्या जिवावर आणि नावावर राजकारण करणारा एक मोठा वर्ग या क्षणी अनाथ व पोरका झाला आहे. महाराष्ट्रातल्या राजकारणातले एक जिद्दी आणि हिंमतबाज व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. अजित पवारांच्या असंख्य आठवणी मागे राहिल्या आहेत.






























































