
मुख्यमंत्री व मिंधे, अजित टोळीतले लोक ठेकेदारीच्या दलालीत कोट्यधीश, अब्जोपती बनले आहेत. महाराष्ट्र कर्जात बुडाला काय किंवा शेतकऱ्यांनी कर्जबाजारी, ओला दुष्काळ यामुळे आत्महत्या केल्या काय, मिंधे वगैरे लोकांना काहीच फरक पडत नाही. कंटाळा आला की, ते हेलिकॉप्टरने शेतावर जातात. ‘थापां’चे पीक काढतात व त्यानंतर इतके टवटवीत होतात की, गुलाब पाकळ्यांनाही त्यांच्या टवटवीतपणाचा हेवा वाटावा. मिंधे वगैरे लोक टवटवीत असतील, पण जनतेच्या चेहऱ्यावर हास्य दिसत नाही. मिंधे यांचे शेत पर्यटनासाठी खुले करावे. त्यांच्या शेतात काय पिकते ते लोकांना कळू द्या. त्यांच्या टवटवीत शेतीचे बियाणे लाखो शेतकऱ्यांना मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
महाराष्ट्राचे सरकार हे थापेबाजांचे सरकार आहे. मुख्यमंत्री फडणवीस व त्यांच्या दोन उपमुख्यमंत्र्यांत थापा मारण्याची जी स्पर्धा सुरू आहे, ती थक्क करणारी आहे. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तर या तिघांच्या थापेबाजीला ऊत आला. मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री मिंधे यांनी सांगितले की, ‘‘शेवटच्या माणसापर्यंत ते विकास पोहोचवणार आहेत.’’ मिंध्यांचे म्हणणे असे की, ‘‘गावांचा विकास झाला तरच तालुक्याचा, जिल्ह्याचा, राज्याचा आणि देशाचा विकास होईल. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांची 2047 पर्यंत विकसित भारताची संकल्पना साध्य करणे शक्य होईल.’’ मिंधे यांनी असेही सांगितले की, ‘‘आपण शेतीत काम करून टवटवीत होत असल्यानेच अधूनमधून गावाकडे जात असतो.’’ मिंधे हे एक गमतीशीर पात्र आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांची स्थिती बरी नाही. पूर-पावसामुळे शेती वाहून गेली. पंचनाम्यास आलेल्या अधिकाऱ्यांसमोर शेतकरी धाय मोकलून रडत आहेत. या आठ दिवसांत 17 शेतकऱ्यांनी व वर्षभरात दोन हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. लाखो शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत व त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू मावळले आहे. त्यामुळे मिंधे यांचे असे कोणते शेत आहे व त्या शेतात असे काय पिकते की, ज्यामुळे
शेतीत काम करून
त्यांचा चेहरा टवटवीत होतो? मग हा टवटवीतपणा राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्याही तोंडावर यावा यासाठी ते काय करीत आहेत? शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवण्याची मिंधे यांची भाषा म्हणजे थोतांड आहे. मिंधे पालकमंत्री असलेल्या ठाण्यातील अनेक आदिवासी पाडे आजही विकास किरणांच्या प्रतीक्षेत आहेत. रस्ते नाहीत, शाळा नाहीत, आरोग्य सेवा नाही. पावसात मुलांना चिखल तुडवीत व प्रसंगी नदीच्या पुरातून शाळेत जावे लागते. आजारी, गरोदर स्त्रियांना तर ‘डोली’ करून तालुक्याच्या ठिकाणी न्यावे लागते. मिंधे विकासाची मुक्ताफळे उधळत असतात, पण शेजारच्या पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात रस्त्याअभावी मृतदेह डोलीत घालून न्यावे लागण्याची वेळ नारनोली गावात आली. या गावातील महेंद्र जाधव यांची तब्येत बिघडली. त्यांना जव्हारच्या रुग्णालयात नेले. तेथे ते मरण पावले. त्यानंतर गावात मृतदेह नेण्यासाठी एक रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही. रस्ताच नसल्याने रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे महेंद्र जाधवांचा मृतदेह गावकऱ्यांना डोलीतून नेण्याची वेळ आली. अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या की, आपल्या चेल्याचपाट्यांकडून पीडितांच्या घरी दोन-पाच लाखांचे पाकीट पाठवायचे व आपण किती मोठे दानशूर कर्णाचे अवतार असल्याप्रमाणे जाहिरातबाजी करायची. मिंधे, अजितदादा, फडणवीस हे याबाबतीत
‘एक से बढकर एक’
आहेत. पंतप्रधान मोदी यांनी लोकांचे जीवन बदलले असा साक्षात्कार या तिघांना काल झाला. मोदी यांनी त्यांच्या काळात असे काय केले की, त्यामुळे लोकांचे जीवन बदलले? महाराष्ट्रासारख्या एकेकाळच्या प्रगत, श्रीमंत राज्यावर आज साडेनऊ लाख कोटींचे कर्ज चढले आहे. गेल्या तीन महिन्यांत राज्य चालविण्यासाठी 24 हजार कोटींचे कर्ज या सरकारने घेतले व राज्य असे कर्जात रुतले असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले की, आता एक कोटी महिलांना आपण लखपती बनवणार आहोत. आधीच कर्जाचा डोंगर वाढला आहे. महाराष्ट्र रसातळाला गेला आहे. भ्रष्टाचार आणि लुटमारीने शिखर गाठले आहे. मुख्यमंत्री व मिंधे, अजित टोळीतले लोक ठेकेदारीच्या दलालीत कोट्यधीश, अब्जोपती बनले आहेत. महाराष्ट्र कर्जात बुडाला काय किंवा शेतकऱ्यांनी कर्जबाजारी, ओला दुष्काळ यामुळे आत्महत्या केल्या काय, मिंधे वगैरे लोकांना काहीच फरक पडत नाही. कंटाळा आला की, ते हेलिकॉप्टरने शेतावर जातात. ‘थापां’चे पीक काढतात व त्यानंतर इतके टवटवीत होतात की, गुलाब पाकळ्यांनाही त्यांच्या टवटवीतपणाचा हेवा वाटावा. मिंधे वगैरे लोक टवटवीत असतील, पण जनतेच्या चेहऱ्यावर हास्य दिसत नाही. मिंधे यांचे शेत पर्यटनासाठी खुले करावे. त्यांच्या शेतात काय पिकते ते लोकांना कळू द्या. त्यांच्या टवटवीत शेतीचे बियाणे लाखो शेतकऱ्यांना मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!