सामना अग्रलेख – कबुतरांसाठी धर्मसभा!

कबुतरांसाठी एक समाज धर्माच्या नावावर हिंसक होतो हे फक्त मोदी काळातच घडू शकते. फडणवीस सरकारने एक अध्यादेश आता काढावा व जैनांवरील अन्याय दूर करावा. मुंबईतील सर्व लोढा टॉवर्सच्या गच्च्या व सोसायटींची मैदाने, सर्व जैन बिल्डरांच्या संकुलात आणि मरीन लाईन्स समुद्रासमोरील नव्याने उभारलेल्या जैन जिमखान्यावर कबुतरखाने सुरू करीत असल्याची घोषणा करावी. शांतताप्रिय जैन समाजाची ही मागणी पूर्ण करायला काहीच हरकत नाही. त्यांना आरक्षण नको. कबुतरांसाठी जागा हवी. ती जैनांच्याच सोसायटीत मिळू शकते. काय हो धर्माचार्य, बरोबर आहे ना?

मुंबई महाराष्ट्राची राजधानी असून मुंबईच्या भवितव्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार मराठी माणसाला आहे. हे राज्य मराठी माणसाच्या बलिदानातून, रक्तातून निर्माण झाले व मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. त्यामुळे मुंबईत कबुतरखाने ठेवायचे की उडवायचे, याबाबत मराठी माणसांशी चर्चा करून काय तो निर्णय घ्यायला हवा. मुंबईत कबुतरखाने नकोत. ते मानवी आरोग्यास धोकादायक असल्याचे मत न्यायालयांनी व तज्ञांनी व्यक्त केल्यावरही जैन समाजाचे धर्मगुरू या विषयाची विझलेली वात पेटवण्याचा प्रयत्न का करीत आहेत? जैन मुनींकडून मृत कबुतरांच्या आत्मशांतीसाठी एका धर्मसभेचे आयोजन करण्यात आले. या कबुतरांच्या धर्मसभेत जैन मुनींनी अनेक वादग्रस्त राजकीय विधाने केली. अशा प्रकारची धर्मांध विधाने याआधी जामा मशिदीचे इमाम, शहाबुद्दीन, ओवेसी यांच्यासारखे पुढारी करत असत. जैन मुनी या सगळ्यांप्रमाणे हिंसक विधाने करत असतील तर ते सर्वस्वी निषेधार्ह आहे. जैन समाज हा अलीकडच्या कालखंडात भारतीय जनता पक्षाचा समर्थक व तारणहार बनला आहे. या समाजातील उद्योगपती आणि व्यापारी वर्गाकडून प्रचंड आर्थिक रसद भाजपला पुरवली जाते. तरीही आम्हाला न्याय का मिळत नाही? हा जैन मुनींचा त्रागा दिसतो. जैन समाज हा शांतिप्रिय आणि सर्वाधिक कर भरणारा समाज आहे. महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी दोन कोटी रुपयांची देणगी देऊनही आमच्या मुद्द्यावर कोणीच लक्ष देत नसल्याचे जैन धर्मगुरूंचे म्हणणे आहे. आता त्यांचे मुद्दे कोणते, तर कबुतरखाने बंद केल्यामुळे अनेक कबुतरांचा मृत्यू झाला. कबुतरांच्या मृतात्म्यांना शांती लाभावी म्हणून जैन समाजाने विशेष प्रार्थना सभा आयोजित केली व कबुतरांना न्याय मिळावा यासाठी

‘शांतिदूत जनकल्याण पार्टी

नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला. जैनांचा हा पक्ष मुंबई पालिका निवडणुकीत उतरणार आहे. ‘कबुतरांमुळे माणसांचे आरोग्य धोक्यात आले व त्यातून दोन-चार माणसे मेली तर काय बिघडले?’ असा प्रश्न जैन मुनींनी विचारला. कबुतरांच्या संरक्षणासाठी शस्त्र उचलण्याची हिंसक भाषा जैन मुनींनी करावी व कायद्याचे रखवालदार यावर गप्प बसतात, यास काय म्हणावे? आम्ही शांतताप्रिय, अहिंसक आहोत असे जैन समाजाचे धर्मगुरू सांगतात, पण विलेपार्ल्यात अनधिपृत जैन मंदिर पालिकेने पाडले तेव्हा व दादरचा कबुतरखाना हायकोर्टाच्या आदेशाने बंद केला तेव्हा जैन समाजाचा आक्रमकपणा शांतता, अहिंसेच्या चौकटीत बसणारा नव्हता. जैन समाज सर्वाधिक टॅक्स भरतो हे खरे असेलही, पण मुंबईसारख्या शहरात सर्वाधिक ‘नफा’ही तेच मिळवत आहेत. मुंबईतील जैनांच्या सोसायटीत मराठी माणसाला घर नाकारणे यास अहिंसा म्हणता येत नाही, तर ती एक प्रकारे हिंसाच आहे. जैन समाजाच्या सोसायटीत एखादी दरोडेखोरांची टोळी शिरली व त्यांनी हिंसा केली तर या दरोडेखोरांशी कोणत्या अहिंसक शस्त्राने लढायचे? याचे मार्गदर्शन जैन धर्माचार्यांनी करायला हवे. पण जैनांना आता स्वतःपेक्षा कबुतरांच्या मृतात्म्यांची चिंता लागून राहिली, पण या निसर्गात फक्त कबुतरांनाच जगण्याचा अधिकार आहे काय? इतर पक्षी, प्राणी, माणसे या जिवांच्या बाबतीतही जैनांनी तीच भावना ठेवायला हवी. ‘मेट्रो’च्या नावाखाली मुंबईचे ‘फुफ्फुस’ असलेल्या आरेतील जंगलावर कुऱ्हाड, बुलडोझर चालवून दोन हजारांवर झाडे एका रात्रीत कापली. त्यात त्या झाडांवर राहणाऱ्या अनेक पक्ष्यांची घरटी खाली आली. पक्षी मेले, त्यांची पिल्ले मेली. त्या पक्ष्यांच्या आकांताने, फडफडाटाने आसमंत अस्वस्थ झाला. पक्ष्यांना आपला कायमचा सुरक्षित निवारा भाजपच्या

जंगली वृत्तीमुळे

गमवावा लागला. त्यात कबुतरेदेखील होती. त्या वेळी ना जैन मुनी पुढे आले, ना जंगलातील मृत पक्ष्यांच्या आत्म्यांना शांती मिळावी म्हणून धर्मसभेचे आयोजन केले. हैदराबादेतही 400 एकर जंगल नष्ट केले जात आहे. झारखंड, छत्तीसगडच्या जंगलातील खनिज साठा अदानीला मिळावा म्हणून मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरू झाली. त्यात असंख्य पक्षी, प्राणी व आदिवासी प्राण गमावत आहेत. त्या सगळ्या मृतात्म्यांचे काय करायचे? चंद्रपूर, गडचिरोलीसारख्या भागांतील खाण उत्पादकांनी सरकारी आशीर्वादाने जंगले तोडली किंवा जंगलांना आगी लावल्या. त्यामुळे पक्ष्यांचे अधिवास नष्ट होतात. घरटी उद्ध्वस्त होतात. त्यांचे राहण्याचे, जगण्याचे आणि अन्न मिळविण्याचे ठिकाण नाहीसे होते. जैनांच्या धर्मसभेला यावरही मानवतावादी दृष्टिकोनातून विचार करावा लागेल. जैनांचे म्हणणे असे की, ‘‘कबुतरखाने हटविण्याची किंमत मोजावी लागेल.’’ हा इशारा आणि धमकी आहे. ती नक्की कोणासाठी आहे? ‘डॉक्टर मूर्ख आहेत. आमचा धर्म सांगतो, दुसऱ्यांसाठी मरायचे असेल तरी चालेल. कबुतरांसाठी एक-दोन जण मेल्याने काय होते?’ ही सध्या जैनांच्या ‘जेन झी’ची भाषा आहे. पहलगाम, पुलवामात निरपराध माणसे मारली गेली, सिंदूर पुसला गेला. त्यांच्या आत्मशांतीसाठी ना धर्मसभा झाल्या, ना पाकिस्तानी दहशतवाद्यांचा निषेध करण्यात आला.पहलगाममध्ये कबुतरखाने नाहीत. ते असते तर त्यांच्यासाठी प्रार्थना सभा झाल्या असत्या. कबुतरांसाठी एक समाज धर्माच्या नावावर हिंसक होतो हे फक्त मोदी काळातच घडू शकते. फडणवीस सरकारने एक अध्यादेश आता काढावा व जैनांवरील अन्याय दूर करावा. मुंबईतील सर्व लोढा टॉवर्सच्या गच्च्या व सोसायटींची मैदाने, सर्व जैन बिल्डरांच्या संकुलात आणि मरीन लाईन्स समुद्रासमोरील नव्याने उभारलेल्या जैन जिमखान्यावर कबुतरखाने सुरू करीत असल्याची घोषणा करावी. शांतताप्रिय जैन समाजाची ही मागणी पूर्ण करायला काहीच हरकत नाही. त्यांना आरक्षण नको. कबुतरांसाठी जागा हवी. ती जैनांच्याच सोसायटीत मिळू शकते. काय हो धर्माचार्य, बरोबर आहे ना?