
पाकिस्तान, जो सदैव दहशतवाद्यांचा पोशिंदा, आर्थिक दिवाळखोर, भारताविरुद्ध कारस्थानांचा केंद्रबिंदू राहिला आहे, तो देश आज जागतिक शांतिदूत बनल्याचे दावे करत आहे. पाकिस्तानसह जगभरातील टीव्ही चॅनल्स, सोशल मीडिया आता ‘पाकिस्तानने दुनिया बचाई’ अशा घोषणा देत आहे. या परिस्थितीत भारत यापुढे पाकिस्तानशी टक्कर घेऊ शकेल काय? पाकच्या जबड्यातला कश्मीर खेचून आणून अखंड हिंदुस्थानची घोषणा आपले संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा करू शकतील काय? अर्थात पंतप्रधान याप्रश्नी आधीच बिळात शिरल्यामुळे त्यांच्याकडून कोणत्याही गर्जनेची अपेक्षा नाहीच. भारताची मान शरमेने खाली घालायला लावण्याचा ‘मास्टर स्ट्रोक’ मोदींनी मारला. अंध भक्तजनहो, वाजवा टाळ्या!
झुकती है दुनिया, झुकानेवाला चाहिए, इराणने हे कृतीत उतरवून दाखवले. काल रात्री प्रे. ट्रम्प यांनी इराणचे नामोनिशाण मिटविण्याची धमकी दिली होती. पुढच्या चार तासांत प्रे. ट्रम्प हे इराणबरोबर ‘शांती वार्ता’ करण्यासाठी टेबलावर बसायला तयार झाले. अमेरिकेने दोन आठवड्यांसाठी युद्धविरामाची घोषणा केली. इराणच्या संघर्ष व राष्ट्राभिमानाचा हा विजय आहे. युद्धाच्या शेवटी जे चित्र समोर आले ते भारतासाठी अत्यंत लाजिरवाणे आणि धक्कादायक आहे. युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तानकडून जी मध्यस्थी झाली, त्याबद्दल प्रे. ट्रम्प व इराणकडून पाकिस्तानचे आभार मानले गेले. मोदी सरकारचे हे सगळ्यात भयंकर अपयश आहे. इराणच्या सभ्यतेस नष्ट करणे कोणालाच शक्य नव्हते. संपूर्ण जगाला याबाबत खात्री होती. सुप्रीम लीडर खामेनींच्या हत्येनंतर प्रे. ट्रम्प आणि इस्रायलच्या नेतान्याहूंना वाटले की, दोन दिवसांत इराणचा पाडाव करू, इराणचे गाझा करू, पण इराणने 35 दिवस त्याच ताकदीने युद्ध रेटले. इस्रायलचेच गाझा केले. अमेरिकेला मदत करणाऱ्या आखाती देशांवर हल्ले केले. प्रे. ट्रम्पविरोधात अमेरिकेच्या जनतेला रस्त्यावर उतरायला भाग पाडले. युद्धामुळे प्रे. ट्रम्प यांचीच खुर्ची धोक्यात आली आणि खुर्ची वाचविण्यासाठी प्रे. ट्रम्प यांना पाकिस्तानची मदत घ्यावी लागली. भारतीय राज्यकर्त्यांच्या तोंडास काळे फासणाऱ्या या घडामोडी आहेत. काल रात्री अमेरिकेच्या सिनेटमध्ये 25 काँग्रेस खासदारांकडून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकार उपाध्यक्ष जेडी वान्स यांच्याकडे ‘ट्रान्सफर’ करण्याचा
प्रस्ताव आणण्याची तयारी
सुरू झाली. त्यावर हडबडलेल्या ट्रम्प यांनी पाकिस्तानला पुढे करून मध्यस्थी व शांती वार्ता स्वीकारण्याची तयारी दर्शवली. ज्या पाकिस्तानची मनमोहन सिंग सरकारने दहशतवादी देश म्हणून जगात नाचक्की केली तोच देश मोदी सरकारच्या मूर्ख कार्यपद्धतीमुळे आंतरराष्ट्रीय नकाशावर महत्त्व प्राप्त करीत आहे. मोदी व त्यांचे सरकार तामीळनाडू, प. बंगाल, आसाम, केरळातील विधानसभा निवडणुकांत राजकीय विरोधकांविरुद्ध कट-कारस्थाने करण्यात गुंतले असताना आंतरराष्ट्रीय मंचावर पाकिस्तानची ढाल करून ट्रम्प यांनी मोदी व भारताचा साफ कचरा केला. प्रे. ट्रम्प, इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी मोदी यांना मध्यस्थी करण्यास सांगितले नाही. हे आमचे विश्वगुरू! राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, मोदी हे देशहितासाठी कोणताच धाडसी निर्णय घेऊ शकत नाहीत. मोदी हे भिजलेल्या उंदराप्रमाणे युद्धकाळात बिळात शिरले व त्याचाच दुष्परिणाम म्हणून युद्धस्थितीचा फायदा घेत पाकिस्तान आणि चीनने स्वतःचे महत्त्व वाढवून घेतले. आमचे विश्वगुरू निवडणूक प्रचारात पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांना शिव्या देण्यात धन्यता मानत आहेत, पण त्याच नेहरू-गांधींनी जागतिक राजकारणात भारताला जे महत्त्व प्राप्त करून दिले ते मोदी काळात नष्ट झाले आहे. इराण-इस्रायल, अमेरिकेतील युद्धात पाकिस्तान
शांततेसाठी प्रयत्न
करीत असल्याचे समोर आले तेव्हाच भारताने सावध व्हायला हवे होते, पण पाकिस्तान हे दलाल राष्ट्र असल्याची मुक्ताफळे विदेश मंत्री जयशंकर यांनी उधळली. त्याच दलाल राष्ट्राच्या राजधानीत यापुढे युद्ध थांबवण्याबाबत शांती वार्ता व शांती चर्चा होणार आहे. इतक्या अपरिपक्व परराष्ट्रमंत्र्याला एक दिवसही पदावर ठेवता कामा नये. पाकिस्तान आज आंतरराष्ट्रीय मंचावर मजबूत झाला त्याची जबाबदारी पंतप्रधान मोदींनी स्वीकारायला हवी. प्रे. ट्रम्प यांच्या आदेशापुढे मान तुकवून मोदींनी जेव्हा ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवले तेव्हाच मोदींचे शौर्य आणि बतावण्या किती तकलादू आहेत ते दिसून आले होते. पहलगामचा बदला पूर्ण न करताच भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ गुंडाळले व इराण-इस्रायल युद्धातही ‘‘मि. मोदी, तोंड बंद करून बसा’’ हाच प्रे. ट्रम्प यांचा आदेश असावा. पाकिस्तान, जो सदैव दहशतवाद्यांचा पोशिंदा, आर्थिक दिवाळखोर, भारताविरुद्ध कारस्थानांचा केंद्रबिंदू राहिला आहे, तो देश आज जागतिक शांतिदूत बनल्याचे दावे करत आहे. पाकिस्तानसह जगभरातील टीव्ही चॅनल्स, सोशल मीडिया आता ‘पाकिस्तानने दुनिया बचाई’ अशा घोषणा देत आहे. या परिस्थितीत भारत यापुढे पाकिस्तानशी टक्कर घेऊ शकेल काय? पाकच्या जबड्यातला कश्मीर खेचून आणून अखंड हिंदुस्थानची घोषणा आपले संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा करू शकतील काय? अर्थात पंतप्रधान याप्रश्नी आधीच बिळात शिरल्यामुळे त्यांच्याकडून कोणत्याही गर्जनेची अपेक्षा नाहीच. भारताची मान शरमेने खाली घालायला लावण्याचा ‘मास्टर स्ट्रोक’ मोदींनी मारला. अंध भक्तजनहो, वाजवा टाळ्या!

































































