सामना अग्रलेख – युद्धाच्या सावटातील चर्चा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्हेनेझुएलानंतर इराण गिळंकृत करण्याच्या दिशेने अमेरिकेची पावले पडताना दिसत आहेत. एकीकडे इराणभोवती वेढा टाकून दुसरीकडे अमेरिकेने युद्ध टाळण्यासाठी ओमानमध्ये इराणसोबत चर्चा सुरू केली आहे. या चर्चेतून काय निष्पन्न होणार, हे 24 तासांत समोर येईलच. मात्र चर्चा फिसकटली तर कुठल्याही क्षणी युद्धाचा भडका उडेल, अशीच चिन्हे आहेत. तसे झाले तर अनेक देश या युद्धात ओढले जातील. म्हणूनच अमेरिकाइराणदरम्यान सुरू असलेल्या युद्धाच्या सावटातील चर्चेकडे जगाचे लक्ष लागले आहे.

काल-परवापर्यंत शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी हटून बसलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सध्या युद्धज्वराने झपाटले आहे. व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना अटक करून अमेरिकेत आणणाऱ्या प्रे. ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावर आपले संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित केले व आता इराणमध्येही अमेरिकेला तेच करायचे आहे. प्रे. ट्रम्प दररोजच  इराणवर भयंकर हल्ला करण्याची धमकी देत आहेत. अमेरिकेच्या धमकीला भीक न घालता इराणनेही अमेरिकेच्या आखाती देशांतील सैन्यतळांवर प्रतिहल्ला चढवण्याचे ऐलान केले आहे. अमेरिकेची अब्राहम लिंकन ही युद्धनौका इराणच्या किनाऱ्यापासून अवघ्या 320 किलोमीटर अंतरावर येऊन पोहोचली आहे. याशिवाय आसपासच्या देशांतील लष्करी तळांवरील युद्ध सामग्रीही सज्ज करून इराणभोवती अमेरिकेने एक तऱ्हेने वेढाच घातला आहे. मात्र अमेरिकेच्या प्रत्येक हालचालीची बित्तंबातमी चीन इराणला पुरवत आहे. रशिया व चीनसारखे मातब्बर देश इराणच्या पाठीशी उभे राहिले आहेत. अमेरिकेला इशारा देण्यासाठी चीन व रशियाच्या नौदलांनी इराणसोबत  नुकताच केलेला युद्ध सराव सूचक म्हणावा लागेल. इराण एकटा नाही, अमेरिकेने हल्ला केला तर रशिया व चीन इराणच्या बाजूने युद्धात उतरतील, अशी भीती अमेरिकेला घालण्यात सध्या तरी इराण यशस्वी झाला आहे. त्यामुळे अमेरिका सावधगिरीने पावले उचलत असला तरी इराणमध्ये

कुठल्याही परिस्थितीत तख्तापलट

करणे हे अमेरिकेचे उद्दिष्ट आहे. गतवर्षी जूनमध्ये इस्रायलसोबत झालेल्या युद्धात इराणचे आधीच आर्थिक कंबरडे मोडले आहे. शिवाय गेला महिनाभर इराणची जनता खोमेनी यांच्या इस्लामी राजवटीविरुद्ध रस्त्यावर उतरली आहे. इराणमध्ये निर्माण झालेली यादवी पाहता खोमेनी यांची राजवट उलथवून टाकण्याची याहून मोठी संधी अमेरिकेला मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे एकीकडे इराणला चर्चेत गुंतवून ठेवायचे आणि दुसरीकडे  चौफेर हल्ला चढवून इराण व तेथील तेलसाठ्यांवर कब्जा करण्याचे अमेरिकेचे मनसुबे आहेत. दोन्ही देशांतील तणाव शिगेला पोहोचला आहे व युद्धाची ठिणगी कधीही पडू शकते, अशी स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ओमानची राजधानी मस्कत येथे अमेरिका व इराण यांच्यात युद्ध टाळण्याच्या दृष्टीने उच्चस्तरीय बैठक होत असली तरी यातून फार काही निष्पन्न होण्याची चिन्हे दिसत नाहीत. ही बैठक आधी तुर्कीमध्ये होणार होती. मात्र उभय देशांनी तलवारी उपसत एकमेकांना ललकारल्यामुळे तुर्कीतील बैठक जवळपास रद्दच होण्याच्या मार्गावर होती. मात्र युद्ध टाळण्याचा अखेरचा प्रयत्न करण्यासाठी ओमानने मध्यस्थी करत पुढाकार घेतला, त्यामुळे किमान दोन्ही देश चर्चेसाठी समोरासमोर येण्यास तरी तयार झाले. तथापि, अमेरिकेच्या दृष्टीने वादाचे जे मुख्य मुद्दे आहेत, त्यावर तोडगा निघण्याची शक्यता कमीच असल्याने पश्चिम आशियावर दाटलेले युद्धाचे ढग अदृश्य होतील, असे समजण्याचे कारण नाही. इराणने

आपला अण्वस्त्र कार्यक्रम

थांबवावा, ही अमेरिकेची मुख्य मागणी आहे. शिवाय अमेरिकेपर्यंत हल्ला करू शकणारी आंतरखंडीय क्षेपणास्त्रे, आखाती देशांतील दहशतवादी गटांना इराणकडून मिळणारा पाठिंबा, इराणमधील मानवाधिकारांचे उल्लंघन व तेथील आंदोलक नागरिकांवर होणारे अत्याचार या मुद्दय़ांवर चर्चा करण्यासाठी अमेरिका आग्रही आहे. तथापि, अणू कार्यक्रमाशिवाय दुसऱ्या कुठल्याही मुद्दय़ावर चर्चा करणार नाही, असे इराणने स्पष्ट केल्यामुळे चर्चेपूर्वीच तिढा निर्माण झाला. शिवाय चर्चा सुरू होण्याच्या काही तास आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन जनतेला तातडीने इराणमधून बाहेर पडण्याची ‘अॅडव्हायझरी’ जारी केल्याने युद्धज्वर अधिकच वाढला आहे. सगळे जग आपल्या मुठीत असावे, असे अमेरिकेला वाटते. आर्थिक व लष्करी सामर्थ्याच्या जोरावर जगातील हव्या त्या देशावर व तेथील साधनसंपत्तीवर कब्जा करण्याच्या राक्षसी हव्यासाने अमेरिकेला पछाडले आहे. व्हेनेझुएलानंतर इराण गिळंकृत करण्याच्या दिशेने अमेरिकेची पावले पडताना दिसत आहेत. एकीकडे इराणभोवती वेढा टाकून दुसरीकडे अमेरिकेने युद्ध टाळण्यासाठी ओमानमध्ये इराणसोबत चर्चा सुरू केली आहे. या चर्चेतून काय निष्पन्न होणार, हे 24 तासांत समोर येईलच. मात्र चर्चा फिसकटली तर कुठल्याही क्षणी युद्धाचा भडका उडेल, अशीच चिन्हे आहेत. तसे झाले तर अनेक देश या युद्धात ओढले जातील. म्हणूनच अमेरिका-इराणदरम्यान सुरू असलेल्या युद्धाच्या सावटातील चर्चेकडे जगाचे लक्ष लागले आहे.