
‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या आपल्या आत्मकथेत जनरल नरवणे यांनी बरेच स्फोट घडवले आहेत, पण सरकारने हे पुस्तक प्रसिद्ध करण्यावर बंदी घातली आहे. राहुल गांधी यांनी या विषयी संसदेत बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना सरकारने बोलू दिले नाही. चिनी सैन्यावर गोळी झाडू नका ही सरकारची भूमिका होती. तेच सैन्य भारतावर चाल करून आले तेव्हा आपले नेतृत्व निर्णय घेऊ शकले नाही. लाल बहादूर शास्त्रींचा नारा होता, ‘जय जवान, जय किसान.’ पंतप्रधान मोदींची गर्जना आहे, ‘जो उचित हो वो करो.’ याचा अर्थ काय समजायचा? मोदींचा ‘मास्टर स्ट्रोक’ दुसरे काय?
मोदी काळात लोकशाही व विरोधी पक्षांचे पूर्ण पतन झाले, तरीही राहुल गांधींसारखे नेते पंतप्रधान मोदी व त्यांच्या सरकारचे वस्त्रहरण करण्याचे काही थांबवत नाहीत. निवृत्त लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकातील मजकुरावरून गांधी यांनी पंतप्रधान मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह व तथाकथित ‘जेम्स बॉण्ड’ अजित डोवाल यांची पळता भुई थोडी केली आहे. सध्याचे सरकार देशाच्या सीमा व राष्ट्रीय सुरक्षेबाबत किती भेदरट आहे, हे गांधी यांनी लोकसभेत दाखवून दिले. राष्ट्रावर परचक्राचे संकट येते तेव्हा देशाचे नेतृत्व निर्णय घेण्यास सक्षम नाही, हे जनरल नरवणे यांच्या पुस्तकातील मजकुरावरून स्पष्ट दिसते. 31 ऑगस्ट, 2020 च्या रात्री चिनी टँक्स पीपल लिबरेशन आर्मीसह भारतीय सीमेच्या दिशेने पुढे येत होते व त्यांचा इरादा नेक नव्हता. जनरल नरवणे यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी संपर्क केला. ‘‘माझ्यासाठी काय आदेश?’’ अशी विचारणा केली. राजनाथ यांनी पंतप्रधान मोदींना फोन करून आदेश घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा, ‘‘जो उचित समझो वो करो’’ असे सांगून संभाषण तोडले. नरवणे यांचे म्हणणे आहे, ‘‘हे चमत्कारिक आहे. कोणतीही आकस्मिक योजना नव्हती. चिनी सैन्याला रोखण्याचा उपाय नव्हता. इतका मोठा निर्णय सैन्यावर सोपवून पंतप्रधान चिनी सैन्याबरोबर युद्ध करण्याचा किंवा टाळण्याच्या निर्णयाची जबाबदारी झटकून मोकळे झाले.’’ जनरल नरवणे यांनी राजकीय नेतृत्वाची क्षमता आणि इतर सगळ्याच बाबतीत मुखवटा फाडला. पंतप्रधानांच्या 56 इंच छातीचा बुडबुडाही या प्रकरणात फुटला.
हे सारे प्रकरण
राहुल गांधी यांनी संसदेत मांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना बोलू दिले गेले नाही व लोकसभा दिवसभरासाठी बंद करून पंतप्रधान, संरक्षणमंत्री निघून गेले. भारतीय नेतृत्व चीनशी सामना करण्यास घाबरते काय? चीनने भारतीय सीमांवर कुरापती सुरूच ठेवल्या. ईशान्येतील ‘तवांग’ वगैरे भागात त्यांची घुसखोरी सुरूच आहे. लडाखची हजारो वर्ग मैल जमीन चीनने ताब्यात घेतली आहे, असे सांगताच सोनम वांगचुक यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करून मोदी सरकारने तुरुंगात टाकले व वांगचुक हे तरुणांना भडकवून देशाची सत्ता उलथवण्याच्या विचारात होते असे सरकारने जाहीर केले. एक शिक्षण तज्ञ, बर्फात राहणाऱ्या भारतीय सैन्यासाठी सौर ऊर्जेचे गरम तंबू निर्माण करणारे वांगचुक हे सरकारला देशद्रोही वाटतात, पण लडाखच्या दिशेने चाल करून येणाऱ्या चिनी सैन्याशी लढायचे की आणखी काय करायचे, यावर मात्र सरकारला निर्णय घेणे जमत नाही. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात 26 हिंदू पर्यटकांचे प्राण गेले. त्यानंतर सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चाही याच नेतृत्वाने विचका केला. पहलगामचा बदला पूर्ण होण्याआधीच भारतीय सैन्याला माघार घ्यायला लावणाऱ्या नेतृत्वाकडून आणखी काय अपेक्षा करणार? ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या आपल्या आत्मकथेत जनरल नरवणे यांनी बरेच स्फोट घडवले आहेत, पण सरकारने हे पुस्तक प्रसिद्ध करण्यावर बंदी घातली आहे. तरीही या पुस्तकातला राष्ट्रीय हिताचा भाग समोर यायचा थांबला नाही. राहुल गांधी यांनी या विषयी संसदेत बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना सरकारने बोलू दिले नाही. राहुल यांचे म्हणणे आहे की, ‘‘देशाच्या नेतृत्वाने निर्णय घेऊन दिशा देणे अपेक्षित असते. निर्णय घेण्यापासून पळून जाऊन
लोकांच्या खांद्यावर निर्णयाचे ओझे
टाकता कामा नये. चिनी घुसखोरीनंतर नेमके हेच पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.’’ भारताला खरा धोका पाकिस्तानपासून नसून चीनपासून आहे, पण कमजोर पाकिस्तानवर दादागिरी करायची व चीनसमोर गुडघे टेकायचे हे एकंदरीत मोदी सरकारचे धोरण आहे. जनतेचा छळ आणि व्यापाऱ्यांचा फायदा करणारे निर्णय तर पंतप्रधान मोदी यांनी धुमधडाक्यात घेतले. नोटाबंदी, लॉक डाऊन, जीएसटीसारखे निर्णय घेण्यास विलंब लावला नाही, पण राष्ट्रीय संकटात सैन्याला आदेश देण्यास यांचे पाय लटपटतात. हेच यांचे शौर्य? दिल्लीत जाहीर सभेत डरकाळ्या फोडायच्या आणि समोर संकट येताच उंदरासारखे बिळात शिरणाऱ्या नेतृत्वाचा ‘उदो उदो’ करणे हा खरा राष्ट्रद्रोह आहे. असे असंख्य राष्ट्रद्रोही अंधभक्त जनरल मनोज नरवणे यांना आता शिव्यांची लाखोली वाहायला सुरुवात करतील. आम्हाला आता चिंता वाटते ती जनरल नरवणे यांच्या सुरक्षेची. पुण्यातील रस्त्यावर आम्ही जनरल अरुण कुमार वैद्य यांच्यासारखा मोहरा गमावला तो अतिरेक्यांकडून. जनरल नरवणे यांना धोका निर्माण होऊ शकतो तो गोडसेवादी अंधभक्तांकडून. प्रे. ट्रम्प यांच्या तालावर नाचणारे चीनचे संकट येताच निर्णय घेत नाहीत व सैन्याला वाऱ्यावर सोडतात. चिनी सैन्यावर गोळी झाडू नका ही सरकारची भूमिका होती. तेच सैन्य भारतावर चाल करून आले तेव्हा आपले नेतृत्व निर्णय घेऊ शकले नाही. लाल बहादूर शास्त्रींचा नारा होता, ‘जय जवान, जय किसान.’ पंतप्रधान मोदींची गर्जना आहे, ‘जो उचित हो वो करो.’ याचा अर्थ काय समजायचा? मोदींचा ‘मास्टर स्ट्रोक’ दुसरे काय?

































































