
पंधरा दिवसांपूर्वीच सादर झालेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील जनतेला जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा देणार, अशा वल्गना राज्य सरकारने केल्या. प्रत्यक्षात स्थिती काय आहे? रुग्णालयात उंदरांचा सुळसुळाट आहे, व्हेंटिलेटरवरील वृद्ध रुग्ण महिलेचा हात उंदीर कुरतडत असताना कर्मचारी दुर्लक्ष करत आहेत आणि त्या बेफिकिरीतून त्या वृद्धेचा दुर्दैवी मृत्यू होत आहे. हीच या मंडळींची जागतिक दर्जाची आरोग्य सुविधा म्हणायची का? एकीकडे अर्थसंकल्पात सार्वजनिक आरोग्याच्या तरतुदीत सुमारे पाच हजार कोटींनी कपात करायची आणि दुसरीकडे जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवेच्या बाता मारायच्या. राज्यातील सार्वजनिक आरोग्य ‘व्हेंटिलेटर’वर आहे. सरकारची आरोग्य व्यवस्था भ्रष्टाचार आणि गैरकारभाराने ‘कुरतडलेली’ आहे. आधी ती नीट करा आणि मग जागतिक दर्जा वगैरेच्या वल्गना करा!
दोन आठवड्यांपूर्वी सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात सरकारने आरोग्य सेवासुविधांबाबत मोठ्या घोषणा केल्या. मात्र भाईंदर येथील एका थरकाप उडविणाऱ्या घटनेने घोषणांची पोलखोलच केली. भाईंदर येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात सुहासिनी माठेकर या वृद्ध महिलेला अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र त्या ठिकाणी त्यांचा हात उंदराने कुरतडला आणि त्यामुळे झालेल्या अतिरक्तस्रावामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रुग्णालयाचा अतिदक्षता विभाग चौथ्या मजल्यावर आहे. तरीही एक उंदीर तेथील व्हेंटिलेटरवरील रुग्णाचा हात कुरतडतो, ड्युटीवर असलेल्या कोणाचेही त्याकडे लक्ष जात नाही. सुहासिनी यांच्या हातातून रक्तस्राव सुरू राहतो, सकाळी त्यांना भेटायला आलेल्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यावर धावाधाव होते, परंतु तोपर्यंत उशीर झालेला असतो आणि अतिरक्तस्रावाने सुहासिनी यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. हे सगळेच भयंकर आणि सरकारी आरोग्य व्यवस्थेच्या अब्रूची लक्तरे वेशीला टांगणारे आहे. रुग्णालय प्रशासनाचे यासंदर्भातील स्पष्टीकरण आणि सारवासारव
हास्यास्पद आणि लज्जास्पद
आहे. आजूबाजूला अनेक इमारतींची बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे तेथील बिळांमधील उंदीर रुग्णालयात घुसले असावेत, असे अजब तर्कट रुग्णालयातर्फे मांडले गेले ते त्या ठिकाणी उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांचा जीव टांगणीला लावणारे आहे. रुग्णालयातील उंदरांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध फवारणीचे कंत्राट दिले होते, असा खुलासाही प्रशासनाने केला आहे. रुग्णालयात उंदरांचा सुळसुळाट असल्याची ही कबुलीच आहे. त्यामुळे सुहासिनी माठेकर यांच्या मृत्यूसाठी रुग्णालयालाच जबाबदार धरायला हवे आणि तसाच गुन्हा दाखल व्हायला हवा. राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये उंदरांचा, तर सरकारच्या आरोग्य विभागात भ्रष्टाचाराचा सुळसुळाट झाला आहे. आरोग्य सुविधांपेक्षा ठेकेदार आणि पुरवठादारांच्या ‘आर्थिक आरोग्या’ची काळजी घ्यायची आणि आपलेही उखळ पांढरे करून घ्यायचे हाच सत्ताधाऱ्यांचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. त्यामुळे आरोग्य सेवासुविधांसाठी वर्षानुवर्षे हजारो कोटी खर्च होऊनही आदिवासी भागात माता-बालकांचा कुपोषणाने, तर मुंबईच्या शेजारी असलेल्या भाईंदर येथे व्हेंटिलेटरवर असलेल्या वृद्धेचा उंदराने हात कुरतडल्याने मृत्यू होत आहे. केंद्रातील सत्ताधारी देशाची आरोग्य व्यवस्था आमूलाग्र
सुधारल्याचा दावा
करीत असतात, परंतु सकल देशांतर्गत उत्पादनाच्या फक्त अडीच टक्के खर्च सार्वजनिक आरोग्यावर केला जात आहे. 140 कोटींच्या आपल्या देशात आजही एकूण इस्पितळ ‘बेड’ची संख्या जेमतेम 13-14 लाख एवढीच आहे. राज्यातील सत्ताधारीही महाराष्ट्राचे ‘आरोग्य’ सुधारणार असल्याचे ढोल पिटत असतात. पंधरा दिवसांपूर्वीच सादर झालेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील जनतेला जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा देणार, अशा वल्गना राज्य सरकारने केल्या. प्रत्यक्षात स्थिती काय आहे? रुग्णालयात उंदरांचा सुळसुळाट आहे, व्हेंटिलेटरवरील वृद्ध रुग्ण महिलेचा हात उंदीर कुरतडत असताना कर्मचारी दुर्लक्ष करत आहेत आणि त्या बेफिकिरीतून त्या वृद्धेचा दुर्दैवी मृत्यू होत आहे. हीच या मंडळींची जागतिक दर्जाची आरोग्य सुविधा म्हणायची का? एकीकडे अर्थसंकल्पात सार्वजनिक आरोग्याच्या तरतुदीत सुमारे पाच हजार कोटींनी कपात करायची आणि दुसरीकडे जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवेच्या बाता मारायच्या. राज्यातील सार्वजनिक आरोग्य ‘व्हेंटिलेटर’वर आहे. सरकारची आरोग्य व्यवस्था भ्रष्टाचार आणि गैरकारभाराने ‘कुरतडलेली’ आहे. आधी ती नीट करा आणि मग जागतिक दर्जा वगैरेच्या वल्गना करा!































































