
सौदी अरेबियाने पाकिस्तानवरील हल्ला हा सौदीवरही आक्रमण असा करार केला. पुन्हा हे सगळे घडले मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या दिवशी. ट्रम्प यांनीही याच मुहूर्तावर भारताला ड्रग्ज तस्कर देशांच्या यादीत टाकले. ट्रम्प आणि सौदी युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी मोदींना दिलेले हे बर्थ डे गिफ्ट म्हणजे मोदी मैत्रीचे ‘हवाबाण’च म्हणावे लागतील. मोदींच्या परराष्ट्र धोरणात ‘बाण’ कधी नव्हताच, आता ‘हवा’देखील राहिलेली नाही. पं. नेहरूंपासून डॉ. मनमोहन सिंग यांच्यापर्यंतच्या सर्व काँग्रेस राजवटींमध्ये पाकिस्तान हे कायम एक कमजोर राष्ट्र राहिले. मोदी राजवटीत मात्र हाच पाकिस्तान एक मजबूत देश म्हणून उभा राहिला आहे आणि त्याला मोदींनी ज्यांना ज्यांना मित्र म्हणून कवटाळले ते सर्व राष्ट्रप्रमुख मदत करीत आहेत. सौदी-पाकिस्तान संरक्षण कराराने मोदींच्या ‘मैत्री डिप्लोमसी’ला पार उघडेनागडे केले आहे!
पंतप्रधान मोदींच्या आणखी एका ‘मित्रा’ने पाकिस्तानशी करार करून मोदी मैत्रीच्या दंतकथांना सुरुंग लावला. सौदी अरेबियाने पाकिस्तानशी महत्त्वाचा संरक्षण करार केला असून या करारानुसार यापुढे एका देशावर झालेला हल्ला दोन्ही देशांवर झालेले आक्रमण समजले जाणार आहे. भारतासाठी हा करार जेवढा धक्कादायक तेवढाच धोकादायक आहे. धक्कादायक एवढ्याचसाठी की, मोदी यांनी पाचच महिन्यांपूर्वी सौदी युवराज मोहम्मद बिन सलमान यांची गळाभेट घेत सौदी अरेबियाला भारताचा ‘विश्वासू मित्र’ वगैरे म्हटले होते. काही वर्षांपूर्वी याच युवराजांचे स्वागत मोदींनी प्रोटोकॉल तोडून केले होते. आता त्यांच्या याच विश्वासू मित्राने मोदी मैत्रीची ‘ऐशी की तैशी’ केली आणि भारताचा परंपरागत शत्रू असलेल्या पाकिस्तानला ‘संरक्षण कवच’ बहाल केले. भारतासाठी ही घडामोड धोकादायकदेखील आहे. कारण ‘ऑपरेशन सिंदूर’सारखी एखादी मोहीम उद्या भारताला करणे भाग पडले तर तो हल्ला पाकिस्तानसह सौदी अरेबियावरही समजला जाईल. त्याचा परिणाम भारताच्या पाकिस्तानबाबतच्या निर्णय प्रक्रियेवर नक्कीच होणार आहे. नेहमीप्रमाणे भारताने यावर ठरलेली प्रतिक्रिया दिली आहे. ‘या करारामुळे सुरक्षा, प्रादेशिक व जागतिक स्थैर्यावर काय परिणाम होतील, याचा भारत अभ्यास करेल. त्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करेल,’ अशी
शब्दांची वाफ
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोडली आहे. पाकड्यांनी तिकडे अमेरिकेपाठोपाठ सौदी अरेबियाच्याही गळय़ात गळे घातले आणि मोदी सरकार एक मख्ख प्रतिक्रिया देण्याशिवाय काहीही करू शकलेले नाही. कुठे गेले मोदींचे ते कणखर वगैरे परराष्ट्र आणि संरक्षण धोरण? मोदी ना ट्रम्प यांचे नाव घेऊन बोलत आहेत, ना सौदी अरेबियावर काही भाष्य करीत आहेत. मोदी परदेशांच्या दौऱ्यावर जातात, तेथील राष्ट्रप्रमुखांना भेटतात तेव्हा त्यांचे अंधभक्त आणि ‘गोदी’ मीडिया असे चित्र निर्माण करते की, जणू मोदींनी त्या राष्ट्रप्रमुखाला आपल्या खिशातच घातले आहे, पण अनेकदा हा भ्रमाचा भोपळा फुटला आहे. मोदींनी आजवर शंभरावर देशांना भेटी दिल्या, त्यांच्या मैत्रीचे गोडवे गायले, पण ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी त्यापैकी एकही देश भारताच्या बाजूने उघडपणे उभा राहिला नाही. अमेरिकेचे प्रे. ट्रम्प आणि मोदी यांच्या गळाभेटीची आजवर काय कमी छायाचित्रे प्रसिद्ध झाली? पण आज चित्र काय आहे? ‘माय डिअर फ्रेण्ड मोदी’ म्हणणाऱया ट्रम्प यांनीच मोदी मैत्री खुंटीवर टांगून ठेवली आणि भारतावर 50 टक्के टॅरिफ लादला. ‘ऑपरेशन सिंदूर’ आपणच थांबविले असे किमान चाळीस वेळा सांगितले. अमेरिकेतील स्थलांतरित भारतीयांना बेड्या घालून गुन्हेगारांसारखे भारतात पाठवले. पाकिस्तानसोबत मोठी व्यापार ‘डील’ केली. पाकिस्तानी लष्करप्रमुख
असीम मुनीर याला पायघड्या
घातल्या. त्याला ‘व्हाईट हाऊस’मध्ये खाना खिलवला. ‘केम छो ट्रम्प’ आणि ‘हाऊडी मोदी’च्या चिंधडय़ा ट्रम्प महाशय गेल्या चार महिन्यांपासून रोजच उडवीत आहेत. मोदी मात्र ‘हाताची घडी तोंडावर बोट’ ठेवून गप्प आहेत. मोदींनी ‘मित्र’, ‘विश्वासू मित्र’ म्हटलेल्या श्रीलंका, मालदीव, तुर्कस्तान, बांगलादेश आदी अनेक देशांनीही मोदी मैत्रीच्या पतंगाचे दोर असेच कापले आहेत. आता सौदी अरेबियाने पाकिस्तानवरील हल्ला हा सौदीवरही आक्रमण असा करार केला. मोदींचे कणखर वगैरे परराष्ट्र धोरण पाकड्यांनी सौदी अरेबियाची ‘पाचर’ मारून फोल ठरवले. पुन्हा हे सगळे घडले मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या दिवशी. ट्रम्प यांनीही याच मुहूर्तावर भारताला ड्रग्ज तस्कर देशांच्या यादीत टाकले. ट्रम्प आणि सौदी युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी मोदींना दिलेले हे बर्थ डे गिफ्ट म्हणजे मोदी मैत्रीचे ‘हवाबाण’च म्हणावे लागतील. मोदींच्या परराष्ट्र धोरणात ‘बाण’ कधी नव्हताच, आता ‘हवा’देखील राहिलेली नाही. पं. नेहरूंपासून डॉ. मनमोहन सिंग यांच्यापर्यंतच्या सर्व काँग्रेस राजवटींमध्ये पाकिस्तान हे कायम एक कमजोर राष्ट्र राहिले. मोदी राजवटीत मात्र हाच पाकिस्तान एक मजबूत देश म्हणून उभा राहिला आहे आणि त्याला मोदींनी ज्यांना ज्यांना मित्र म्हणून कवटाळले ते सर्व राष्ट्रप्रमुख मदत करीत आहेत. सौदी-पाकिस्तान संरक्षण कराराने मोदींच्या ‘मैत्री डिप्लोमसी’ला पार उघडेनागडे केले आहे!