देशाच्या सीमा सुरक्षित नाहीत. चीन देशाचा नकाशा बदलू पाहत आहे. त्याची चिंता न करता दिल्लीचे थापाडे हरयाणा विजयाचे डमरू वाजवत आहेत. सत्य, न्याय, नीती यांपासून फारकत घेतलेले हे सर्व लोक महाराष्ट्र भूमीवर आक्रमण आणि अतिक्रमण करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक मर्द मावळ्याने हाती खड्ग घेऊन प्रतिकारास सज्ज व्हायला हवे. महाराष्ट्र मेल्या आईचे दूध प्यायलेला नाही. वाघिणीचे दूध पिऊन तो मैदानात युद्धासाठी उतरला आहे. सीमोल्लंघनाची ललकारी घुमली आहे!
आजचा दिवस सीमोल्लंघनाचा, पण सध्या आपल्या देशाच्या सीमा तोडून चीनसारखे देश आत घुसले आहेत. अर्थात त्याची ना सरकारला चिंता आहे ना त्यांच्या अंधभक्तांना फिकीर आहे. हिंदू परंपरेनुसार सीमोल्लंघन करायचे तर शमीच्या झाडावरची शस्त्रे काढायची व संध्याकाळी आपट्याची पाने सोने म्हणून लुटायची हे तर आता शतकानुशतके सुरूच आहे. हिंदूंनी फक्त परंपरा पाळायच्या व काहींनी त्याच परंपरांचे राजकीय भांडवल करून मतांचा बाजार मांडायचा. देशाचे पंतप्रधान मोदी हे अधूनमधून हिंदूंच्या नावाने सीमोल्लंघन करीत असतात. ‘हिंदू खतरे मे’ असल्याच्या वल्गनाही करतात. दोनच दिवसांपूर्वी त्यांना हिंदुत्वाच्या उचक्या पुन्हा लागल्या व ते म्हणाले, “काँग्रेस हिंदूंमध्ये फुटीची बीजे टाकत आहे.’’ पंतप्रधान पदावरील व्यक्तीने असे बोलणे शोभत नाही हे पहिले व मोदींसारखा कर्मठ हिंदुत्ववादी सत्तेवर असताना देशात ‘हिंदू खतरे मे’ येतोच कसा? हे दुसरे. काँग्रेस राजवटीत ‘इस्लाम खतरे मे’ होता व मोदी राज्यात ‘हिंदू खतरे मे’ आला. तरीही अंधभक्त मोदींना विष्णूचा अवतार मानतात हे एक आक्रितच म्हणायला हवे. हिंदू धर्म काही चहाच्या पेल्यात बुडून जाण्याइतका किंवा मिश्या काढताच मरून जाण्याइतका लेचापेचा नाही. हिंदू धर्म प्रगतशील आणि विज्ञानवादी आहे. हिंदू धर्माचे अस्तित्व खाण्यापिण्यावर व इतरांच्या प्रार्थनास्थळांसमोर
ढोल–ताशे वाजवून
गुलाल उधळण्यावर टिकून नाही. जात्यंध दंगलीवरच हिंदूंचे जीवन-मरण टिकून आहे, असे वाटणाऱ्यांपैकी आपले पंतप्रधान मोदी आहेत. हिंदू धर्म जेव्हा मरेल, तेव्हा बुद्धीची उपासना मरेल. हिंदूंची बुद्धी तेजस्वी आहे हाच भाजपवाल्यांना धोका आहे. लोकसभा निवडणुकीत हिंदूंसह बहुसंख्य मुसलमानांनी भाजपविरोधात मतदान केले. त्यामुळे मोदींच्या पायाखालची बहुमताची सतरंजी सरकली. यावर त्यांनी काय म्हणावे, “हा तर व्होट जिहाद आहे.’’ मुसलमान या देशाचे नागरिक व मतदार आहेत. मुसलमानांची मते मिळावीत म्हणून मोदी व त्यांचे लोक नाना खटपटी करतात. आताही केंद्राचे अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी पुण्यात येऊन सांगितले, ‘‘भाजपला मतदान केल्यास मुस्लीम समाजाला मंत्रीपदे देऊ.’’ आता यास काय म्हणायचे? मुस्लिमांचे मतांसाठी लांगूलचालन तुम्ही करायचे व दुसऱ्यांकडे बोट दाखवून ‘व्होट जिहाद’च्या नावाने बांग द्यायची, हे ढोंग आहे. अशा सीमोल्लंघनाची देशाला व महाराष्ट्राला गरज नाही. हिंदू धर्मात लोकशाही व स्वातंत्र्यास महत्त्व आहे. या दोन्ही गोष्टी आज कोठेच दिसत नाहीत. चळवळी, आंदोलने करणाऱ्यांना देशाचे शत्रू समजून त्यांना कायद्याच्या कचाटय़ात अडकवले गेले आहे. एकेकाळी ध्येयाने पेटलेले लोक समाजात उभे राहत. ते साऱ्या समाजाला मार्गदर्शन करीत. मात्र आज असे
ध्येयवेडे
राहिलेले नाहीत. पैशाने विकले जाणारे बाजारबुणगेच सर्वत्र उभे राहिलेले दिसतात. महाराष्ट्रात तर भ्रष्टाचारातून सत्ता आणि त्या सत्तेतून पुनः पुन्हा भ्रष्टाचार असेच सुरू आहे. महाराष्ट्रास भ्रष्टाचाराने लुळेपांगळे करून शिवरायांचे हे राज्य बदनाम करण्याचा डाव सध्याच्या दिल्लीश्वरांनी रचला आहे. समृद्ध महाराष्ट्र आज विकलांग महाराष्ट्र होताना पाहणे यासारखी वेदना नाही. बेइमानांचे एक राज्य महाराष्ट्रावर लादून दिल्लीश्वर औरंगजेबाप्रमाणे विकट हास्य करीत आहेत. राज्यात जाती-जातीत वादाचे निखारे पेटवून महाराष्ट्राला चूड लावण्याचे फडणवीसी कारस्थान व मिंध्यांचे कपट उधळून लावणे हेच या वेळचे खरे सीमोल्लंघन ठरेल. महाराष्ट्र राज्याने शिवरायांचा आदर्श पाळला. त्या शिवरायांचा पुतळा भ्रष्टाचाराच्या ओझ्याने कोसळला तरी राज्यकर्ते भ्रष्टाचार करायचे थांबत नाहीत. निर्लज्जपणाचा हा कळस आहे. देशाच्या सीमा सुरक्षित नाहीत. चीन देशाचा नकाशा बदलू पाहत आहे. त्याची चिंता न करता दिल्लीचे थापाडे हरयाणा विजयाचे डमरू वाजवत आहेत. सत्य, न्याय, नीती यांपासून फारकत घेतलेले हे सर्व लोक महाराष्ट्र भूमीवर आक्रमण आणि अतिक्रमण करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक मर्द मावळ्याने हाती खड्ग घेऊन प्रतिकारास सज्ज व्हायला हवे. महाराष्ट्र मेल्या आईचे दूध प्यायलेला नाही. वाघिणीचे दूध पिऊन तो मैदानात युद्धासाठी उतरला आहे. सीमोल्लंघनाची ललकारी घुमली आहे!