सामना अग्रलेख – उदंड झाले टॉपर्स! ‘नीट’ घोटाळ्याचा गुजरात पॅटर्न

नीटच्या परीक्षेतील पेपरफुटी निकालातील घोटाळ्यांमुळे देशाच्या शिक्षण व्यवस्थेची पुरती बेअब्रू झाली आहे. पेपर फोडून हवे ते परीक्षा केंद्र मिळवण्यासाठी गुजरातमध्ये लाखो रुपयांची बोली लागली. उत्तरपश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात आणि चंदिगढच्या महापौर निवडणुकीत ज्याप्रमाणेग्रेसदेऊन मतघोटाळा करण्यात आला, त्याच पद्धतीनेनीटपरीक्षेतहीग्रेसच्या माध्यमातून वाढीव गुणांचा घोटाळा करण्यात आला. ‘नीटपरीक्षेतील महाघोटाळ्याची व्याप्ती बघता आधीची परीक्षा रद्द करून ही संपूर्ण परीक्षाच आता नव्याने घ्यायला हवी. पेपरफुटीचागुजरात पॅटर्नआणि उदंड टॉपर देणाऱ्या परीक्षेतील एकूणच भानगडींची सीबीआय चौकशी करूननीटच्या लाखो विद्यार्थ्यांना न्याय दिलाच पाहिजे!

देशात गेली काही वर्षे सर्वत्र फोडाफोडीचेच राज्य सुरू आहे. सरकारे फोडली गेली, पक्ष फोडले गेले. नेते व आमदार, खासदार फोडले गेले. नोकरभरतीच्या परीक्षांचे पेपर कायमच फोडले जात आहेत व आता तर या फोडाफोडीच्या यादीमध्ये वैद्यकीय प्रवेशांसाठीच्या ‘नीट’ परीक्षेचाही समावेश झाला आहे. देशातील तमाम तरुण वर्गाने, विद्यार्थी वर्गाने व देशभरातील पालकांनी पेटून उठावे, असे हे भयंकर प्रकरण आहे. आश्चर्य असे की, सरकार व आमदार-खासदारांच्या फोडाफोडीसाठी जसा ‘व्हाया सुरत’ ‘गुजरात पॅटर्न’ वापरला गेला, त्याच धर्तीवर ‘नीट’ परीक्षेचा पेपर फोडण्यासाठी ‘व्हाया गोध्रा’ हा नवीन गुजरात पॅटर्न वापरण्यात आला. ‘नीट’ परीक्षेतील घोटाळ्याचे ‘गुजरात कनेक्शन’ भयंकर चीड आणणारे आहे. 5 मे रोजी देशभरातील सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. मात्र पेपरची विक्री ते ‘ग्रेस’ पद्धतीने गुणांची बेकायदा खिरापत वाटून निकाल जाहीर करेपर्यंत प्रत्येक पातळीवर घोटाळे होत राहिले. या विक्रमी घोटाळ्यामुळे ‘नीट’च्या परीक्षेत 720 पैकी 720 गुण मिळवणाऱ्या ‘टॉपर्स’ची संख्या यंदा तब्बल 67 वर पोहोचली. गतवर्षी टॉपर्सची हीच संख्या केवळ दोन होती. गुजरातच्या गोध्रा शहरातील जय जलाराम स्कूल या शाळेमधील ‘नीट’ परीक्षेचे केंद्र मिळवण्यासाठी तर तब्बल 10 लाख रुपयांची बोली लागली होती. कारण ‘नीट’चा पेपर फोडून जास्तीत जास्त गुण मिळवून देण्याची जबाबदारी वडोदरा येथील एका कोचिंग क्लासेसच्या संचालकाने घेतली होती. परशुराम रॉय हा कोचिंग सेंटरचा संचालक व जय जलाराम शाळेतील शिक्षक तुषार भट्ट या दोघांनी मिळून ‘नीट’ परीक्षेत अव्वल

गुण मिळवून देण्याचे दुकानच

गोध्रा येथे थाटले होते. ‘नीट’मधील यशाच्या हमीचा पैसे फेकून उपलब्ध झालेला हा गुजरातमधील शॉर्टकट एजंटांमार्फत देशातील अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला. त्यामुळे आपल्या घराजवळच्या परीक्षा केंद्राचा पर्याय सोडून बिहार, झारखंड, ओडिशा, कर्नाटक वगैरे राज्यांतील विद्यार्थ्यांनी हजारो किलोमीटर दूर असलेल्या गुजरातमधील गोध्रा या परीक्षा केंद्राची निवड केली. त्यासाठी या विद्यार्थ्यांच्या पालकांनी एजंटांना लाखो रुपयांची लाच दिली. पालकांकडून 12 कोटी रुपये उकळल्यानंतर विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग सांगितला गेला. ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येत नाहीत, ती जागा रिकामी सोडा, परीक्षेनंतर उत्तरपत्रिकेत तुम्ही सोडून दिलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे आम्ही भरू, असे आश्वासन विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. गुजरातप्रमाणेच बिहारमध्येही ‘नीट’चा पेपर फोडण्यात आला. पाटण्यात परीक्षेच्या एक दिवस आधी म्हणजे 4 मे रोजीच पेपर फोडणाऱ्या टोळीने पैसे देणाऱ्या 25 विद्यार्थ्यांना एका होस्टेलमध्ये नेले. तिथे या विद्यार्थ्यांना उत्तरांसह प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी परीक्षेत सर्वांना हुबेहूब तीच प्रश्नपत्रिका मिळाली. पेपरफुटीत सामील असणाऱ्या टोळीने देशाच्या किती राज्यांत व किती शहरांत हा गोरखधंदा केला असेल, हे त्या टोळीलाच ठाऊक. मेडिकल, डेंटल व आयुष या वैद्यकीय शाखांसाठी प्रवेश मिळवण्यासाठीचे प्रवेशद्वार म्हणून ज्या ‘नीट’ परीक्षेकडे पाहिले जाते, त्या देशातील अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेची ही अवस्था आहे. सुशासन व पारदर्शकता यांसारख्या शब्दांच्या बाजारगप्पा मारणाऱ्या राज्यकर्त्यांच्या नाकाखाली हा घोटाळा झाला. पेपरफुटीबरोबरच ‘ग्रेस’ गुणांच्या माध्यमातूनही निवडक विद्यार्थ्यांचे चांगभले करण्यात आले. ‘टाईम लॉस’ अर्थात परीक्षेत झालेल्या वेळेच्या अपव्ययामुळे कुणाचे किती प्रश्न सुटले याचा कुठलाही विचार न करता

नियमबाहय़पणे 1563 विद्यार्थ्यांना

ग्रेस’ गुणांची खिरापत वाटण्यात आली. आता हे वाढीव गुण रद्द करून त्या विद्यार्थ्यांना नव्याने परीक्षा देण्यास सांगण्यात आले आहे. परीक्षेत पेपरफुटीपासून असे अनेक घोटाळे केल्यानंतर धास्तावलेल्या एनटीएने घोटाळ्याची वाच्यता होऊ नये म्हणून आणखी एक घोटाळा केला. ‘नीट’च्या परीक्षेचा निकाल 10 जून रोजी जाहीर होणार, असे एनटीएने आधी जाहीर केले होते. मात्र परीक्षेतील भानगडींवर चर्चा होऊ नये म्हणून मुद्दाम लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी म्हणजे 4 जून रोजी ‘नीट’चे निकाल जाहीर करण्यात आले. लोकसभेच्या निकालामुळे एक दिवस शांततेत गेला, पण दुसऱ्या दिवशी या घोटाळ्याला तोंड फुटलेच. देशातील सर्वात महत्त्वाच्या परीक्षेतील घोटाळ्याच्या गुजरातमधील सूत्रधारापर्यंत ‘नीट’च्या प्रश्नपत्रिका कशा पोहोचल्या? ‘नीट’च्या परीक्षेतील पेपरफुटी व निकालातील घोटाळ्यांमुळे देशाच्या शिक्षण व्यवस्थेची पुरती बेअब्रू झाली आहे. पेपर फोडून हवे ते परीक्षा केंद्र मिळवण्यासाठी गुजरातमध्ये लाखो रुपयांची बोली लागली. उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात आणि चंदिगढच्या महापौर निवडणुकीत ज्याप्रमाणे ‘ग्रेस’ देऊन मत-घोटाळा करण्यात आला, त्याच पद्धतीने ‘नीट’ परीक्षेतही ‘ग्रेस’च्या माध्यमातून वाढीव गुणांचा घोटाळा करण्यात आला. ‘नीट’ परीक्षेतील महाघोटाळ्याची व्याप्ती बघता आधीची परीक्षा रद्द करून ही संपूर्ण परीक्षाच आता नव्याने घ्यायला हवी. पेपरफुटीचा ‘गुजरात पॅटर्न’ आणि उदंड टॉपर देणाऱ्या परीक्षेतील एकूणच भानगडींची सीबीआय चौकशी करून ‘नीट’च्या लाखो विद्यार्थ्यांना न्याय दिलाच पाहिजे!