सामना अग्रलेख – कोण कोणाला गिळणार? अर्थात शकुनींचा गौरव सोहळा

महाराष्ट्रातील सत्तापक्षांमध्ये एक प्रकारचे ‘प्रॉक्सी वॉर’ चालले आहे. प्रत्येक जण एकमेकाला आजमावीत आहेत. संजय शिरसाट या मंत्र्याने अजित पवारांना ‘शकुनी’ म्हटले. सामाजिक न्याय खाते बंद करण्याची मागणीच संबंधित मंत्र्याने करावी व अजित पवारांना ‘शकुनी’ म्हणावे इथपर्यंत राज्याच्या सरकारमधील युद्ध पोहोचले आहे. आता शकुनीमामाने आयोजित केलेल्या गौरव सोहळ्यास जाण्याचे ताज्या ताज्या माजी मुख्यमंत्र्यांनी टाळले. प्रश्न इतकाच आहे की, अजित पवारांना आज जे ‘शकुनी’ म्हणतात, ते उद्या फडणवीस यांना दुर्योधन म्हणायला मागेपुढे पाहणार नाहीत. आंबेडकर म्हणतात, ‘तो गिळण्या’चा क्षण जवळ येत आहे. कोण कोणाला गिळणार एवढेच पाहायचे!

महाराष्ट्र सरकारकडे बहुमताचा आकडा आहे, पण सरकार स्थिर आहे काय? याबाबत शंका आहे. सरकार स्थिर नाही आणि सरकारचे मानसिक स्वास्थ्यही बरे नाही असे एकंदरीत रोजच्या घडामोडींवरून दिसते. देवेंद्र फडणवीस हे सध्या मुख्यमंत्री आहेत. त्याच वेळी अजित पवार यांनाही मुख्यमंत्री व्हायचे आहे व तसे त्यांनी उघडपणे बोलून दाखवले. अजित पवार सहावेळा उपमुख्यमंत्री झाले हा विक्रम आहे, पण इतका तगडा गडी अद्याप मुख्यमंत्री झालेला नाही व भाजपसोबत राहिले तर त्यांच्या मनातली मुख्यमंत्रीपदाची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. अमित शहा सवतीच्या पुतण्याला मुख्यमंत्री का करतील? हा साधा प्रश्न आहे. ‘कित्येक वर्षे मलाही मुख्यमंत्री व्हावे असे वाटते आहे, पण तो योग कुठेही जुळून आलेला नाही,’ अशी कबुली अजित पवार यांनी शनिवारी पुन्हा दिली. अजित पवार हे असे बोलले तरी फडणवीस यांना त्यांच्यापासून धोका नाही. अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मुख्यमंत्र्यांचा गौरव सोहळा आयोजित केला होता. महाराष्ट्रात या पक्षाचे काम अजित पवार बघतात. महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्काराची टूम त्यांनी काढली. मात्र वरळीच्या जांबोरी मैदानात झालेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्कार सोहळ्यात तसे कोणी फिरकलेच नाहीत. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री या ‘गौरव सोहळय़ा’त फिरकले नाहीत हे समजण्यासारखे आहे, पण जिते-जागते-ताजे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गौरव सोहळय़ावर बहिष्कार टाकला व आपला प्रतिनिधी त्या कार्यक्रमास पाठवला. शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री म्हणून सत्कार सोहळय़ास येणे टाळले. कारण ‘आपण आता मुख्यमंत्री नाही’ हे स्वीकारायला

त्यांचे मन

तयार नाही. विधानसभा निवडणुकीनंतरही आपणच मुख्यमंत्री होणार असल्याचे त्यांना त्यांच्या ‘पक्षप्रमुखां’नी म्हणजे अमित शहांनी सांगितले होते, पण फडणवीस यांनी वाढलेले ताट हिसकावून घेतले. तेव्हापासून हे महाशय दाढीला गाठ बांधून फिरत आहेत. ‘‘पुन्हा मुख्यमंत्री होऊनच दाखवतो,’’ अशाच तोऱयात ते फिरत असतात. खरे म्हणजे शिंदे हे स्वतःला ‘माजी’ म्हणवून घ्यायला तयार नसतील तर त्यांनी स्वतःला सदैव ‘भावी मुख्यमंत्री’ असे म्हणवून घ्यायला हरकत नाही. एकंदरीत महाराष्ट्राच्या विद्यमान सरकारमध्ये गोंधळ आहे. या गोंधळात महाराष्ट्राचे नुकसान होत आहे. अजित पवारांच्या गटाने आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यास दोन माजी मुख्यमंत्री हजर राहिले. त्यापैकी एक नारायण राणे हे शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये मुख्यमंत्री होते. नंतर त्यांनी बरेच पक्ष बदलले, पण मुख्यमंत्री काही झाले नाहीत. याचा अर्थ शिवसेनाप्रमुखांनी अनेक दगडांना शेंदूर फासला व देव बनवले. ‘‘शिवसेना नसती तर पोलिसांनी आपले एन्काऊंटरच केले असते. शिवसेना होती म्हणून वाचलो’’ अशी कबुलीच राणे यांनी पूर्वी दिली आहे. दुसरे उपस्थित राहिलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे मुख्यमंत्रीपद संरक्षण खात्याच्या आदर्श घोटाळ्यात गेले. आता ते भाजपमध्ये गेले आहेत. अशा मुख्यमंत्र्यांचा (माजी) सत्कार अजित पवार गटाने केला. फडणवीस यांचा सत्कार ‘माजी’ की ‘आजी’ म्हणून केला ते समजले नाही, पण ‘ताजे’ माजी मुख्यमंत्री आले नाहीत व अजित पवार यांचा सोहळा फिका पडला. शरद पवार व अजित पवारांच्या भेटीगाठी वाढल्या असे सांगतात, पण शरद पवार अजित पवारांच्या राजकीय ‘गौरव’ कार्यक्रमास उपस्थित राहिले नाहीत हा एक

महत्त्वाचा संदेश

महाराष्ट्राला मिळाला आहे. गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाला सर्वच माजी मुख्यमंत्री आले असते तर बरे झाले असते असे श्री. फडणवीस म्हणाले. इतर सर्व माजी मुख्यमंत्र्यांचे सोडा, सरकारमधले ताजे ताजे माजी मुख्यमंत्रीही का आले नाहीत ते आधी सांगा. ताज्या माजी मुख्यमंत्र्यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचेच आहे व त्यासाठी ते काहीही करतील. प्रकाश आंबेडकरांनी इशारा दिला आहे की, ‘‘शिंदे-पवारांनी सावध रहावे. अजगर कधी गिळेल ते कळणार नाही.’’ आंबेडकरांनी फडणवीस यांना अजगराची उपमा दिली, पण ज्यांनी कामाख्यादेवी मंदिरात 56 रेडे कापून बळी दिले ते अजगराच्या डोक्यावर हल्ला करायला मागेपुढे पाहणार नाहीत. महाराष्ट्रातील सत्तापक्षांमध्ये एक प्रकारचे ‘प्रॉक्सी वॉर’ चालले आहे. प्रत्येक जण एकमेकाला आजमावीत आहेत. अजित पवार यांनी अर्थखात्यात शिस्तीचा बांबू उगारला आहे, तर मुख्यमंत्र्यांनी ठेकेदाराच्या वर्चस्वाला चाप लावल्याने ताजे माजी मुख्यमंत्री आणि त्यांच्या लोकांच्या घशाला कोरड पडली. संजय शिरसाट या मंत्र्याने अजित पवारांना ‘शकुनी’ म्हटले. सामाजिक न्याय खात्याचा निधी ‘लाडक्या बहिणीं’साठी वळवला. त्यामुळे सामाजिक न्याय खात्यात फक्त एक मंत्र्याचा बंगला, गाडी व दोन चपराशी उरले. सामाजिक न्याय खाते बंद करण्याची मागणीच संबंधित मंत्र्याने करावी व अजित पवारांना ‘शकुनी’ म्हणावे इथपर्यंत राज्याच्या सरकारमधील युद्ध पोहोचले आहे. आता शकुनीमामाने आयोजित केलेल्या गौरव सोहळ्यास जाण्याचे ताज्या ताज्या माजी मुख्यमंत्र्यांनी टाळले. प्रश्न इतकाच आहे की, अजित पवारांना आज जे ‘शकुनी’ म्हणतात, ते उद्या फडणवीस यांना दुर्योधन म्हणायला मागेपुढे पाहणार नाहीत. आंबेडकर म्हणतात, ‘तो गिळण्या’चा क्षण जवळ येत आहे. कोण कोणाला गिळणार एवढेच पाहायचे!