
फुलाचा पाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचा भार एकाच शिक्षिकेच्या खांद्यावर टाकण्यात आला होता. त्यामुळे २७ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात सापडले. याप्रकरणी दैनिक ‘सामना’ वृत्तपत्राने दखल घेत वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने दुसऱ्या शिक्षिकेला तत्काळ फुलाचा पाडा शाळेत हजर राहण्याचे आदेश दिले. बोईसर पूर्वेकडील लालोंडे फुलाचा पाडा येथील जिल्हा परिषद शाळेत तब्बल २७ विद्यार्थी शिकत असूनही केवळ एकाच शिक्षिकेवर संपूर्ण अध्यापनाचा ताण टाकण्यात आला.
पूर्वी येथे दोन शिक्षिका कार्यरत होत्या, परंतु ८ ऑक्टोबर रोजी शिक्षिका रक्षा संखे यांची बदली करून त्या जागी मुरबे येथील तृप्ती गावड यांची नियुक्ती केली. विशेष म्हणजे गावड या १५ ऑक्टोबरला एकदाच शाळेत आल्या आणि त्यानंतर त्या फिरकल्याच नाहीत. गावड या मुरबे बंदरपाडा शाळेत कार्यरत असून पगार मात्र फुलाचा पाडा शाळेतूनच घेत असल्याचा आरोप पालकांनी केला. दरम्यान कागदोपत्री दोन शिक्षिका कार्यरत असताना एका शिक्षिकेवर २७ विद्यार्थ्यांना शिकवण्याचा भार टाकण्यात आल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली होती.
सोमवारपासून शाळेत शिक्षिका रुजू
२७ विद्यार्थ्यांवर एकाच शिक्षिकेचा ताण टाकण्यात आल्याचे वृत्त दैनिक ‘सामना’ मध्ये प्रसिद्ध होताच शिक्षण विभागाची धांदल उडाली. काही तासांतच प्रशासनामध्ये हालचाल सुरू झाली आणि नियुक्त शिक्षिका तृप्ती गावड यांना येत्या सोमवारपासून फुलाचा पाडा शाळेत रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला दैनिक ‘सामना’च्या दणक्यानंतर दिलासा मिळाल्याने पालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला आहे.


























































