ज्या पक्षात गेले त्यांच्या स्क्रिप्ट बोलाव्या लागतात, हे दुर्दैवी! संतोष धुरींच्या आरोपांना सचिन अहिर यांचे सणसणीत उत्तर

महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी जाहीर झाल्यापासून तिकीट न मिळालेल्या उमेदवारांचे नाराजी नाट्य पहायला मिळाले. यावेळी मनसेकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे मनसेचे माजी नगरसेवक सरचिटणीस राहिलेल्या संतोष धुरी यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला.पक्षप्रवेशावेळी त्यांनी मनसे आणि शिवसेनेच्या युतीवर गंभीर आरोप केले. या आरोपांना फेटाळून लावत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सचिन अहिर यांनी संतोष धुरी यांचा समाचार घेतला. ज्या पक्षात गेले त्या पक्षानेच त्यांना स्क्रिप्स दिल्या असल्यामुळे त्यांना या सर्व गोष्टी बोलाव्या लागतात, असा शब्दात त्यांनी टीका केली.

सचिन अहिर यांनी माध्यमांशी बोलताना संतोष धुरीसह भाजपवरही निशाणा साधला. कालपर्यंत जे कौतुक आणि स्तुती करत होते. विशेष: या दोन्ही कुटुंबाने आणि पक्षाने एकत्र यायला पाहिजे अशी भावना व्यक्त करत असताना, निव्वळ फक्त निवडणुकीची एक सीट मिळाली नाही, म्हणून आता ते अशा टीका आणि आरोप करत आहेत. ज्या पक्षात गेले त्या पक्षानेच त्यांना स्क्रिप्स दिल्या असल्यामुळे त्यांना या सर्व गोष्टी बोलाव्या लागतात. परंतु ही एक दुर्दैवी गोष्ट अशी आहे. टीका करताना काही मर्यादा पाळल्या पाहिजे, असे सचिन अहिर यावेळी म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, दादरमध्ये ज्या सीटवर मनसेचा दावा होता, त्या दोन्ही प्रभागामध्ये आमचे नगरसेवक त्यावेळी निवडून आले होते. अस असताना देखील यशवंत किल्लेदारांसाठी एक सीट आम्ही सोडली. त्यामुळे तिथल्या आमच्या कार्यकर्त्यांना वेगळा निर्णय घ्यावा लागला. असं असताना देखील पूर्ण पक्ष ताकदीने यशवंत किल्लेदारांच्या मागे उभा आहे. आणि तिथे काम करण्याचा प्रयत्न आपण करतोय. त्यामुळे ज्या प्रभागात त्यांचा संबंध नाही तिथली एक सीट नाही मिळाली म्हणून आपल्या नेत्यांवर टीका करण्याचा त्यांना प्रयत्न आहे, असा हल्लाबोल यावेळी अहिर यांनी केला.

भाजपची स्क्रिप्ट वाचण्यापेक्षा तिथली वस्तुस्थिती लोकांनी त्यांनी सांगितली तर बर होईल, असा खोचक टोला अहिर यांनी संतोष धुरी यांना लगावला. धुरींची इच्छा होती. एका प्रभागामधून त्यांना लढायचं होतं. निव्वळ माझ्याबरोबर नाही तर विभाग प्रमुखांबरोबर देखील ती चर्चा होती. परंतु शेवटी तो निर्णय कोणत्या पक्षाने कोणती सीट सो़डायची हा त्यांचा प्रश्न असतो. असं असताना देखील पक्ष म्हणून पूर्ण ताकदीने आम्ही त्यांच्या बाजूने उभे राहीलो, असे ते म्हणाले.

ही तडजोडीची भूमिका असते. आणि सीटसाठी कुठेतरी आपण भांडण करतोय, हे चित्र लोकांसमोर जाता कामा नये. हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी हे स्पष्ट केलं होतं. म्हणून वरळी विधानसभेत आमच्या सीट ज्या निवडून आल्या होत्या त्या ते देखील देण्याची भूमिका आम्ही घेतली. काही ठिकाणी त्यांच्या सीट होत्या मात्र नगरसेवक नसल्याने त्या देखील सीट आम्ही सोडल्या, असे ते यावेळी म्हणाले.