सचिन पायलट यांच्यासह 19 बंडखोर आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

बंडाचे निशान फडकविणाऱ्या सचिन पायलट यांच्याबाबत काँग्रेस पक्षाने आणखी एक आक्रमक पाऊल उचलले आहे. पायलट यांच्यासह 19 बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस विधानसभा अध्यक्षांनी बजावली आहे. तसेच राजस्थानातील सर्व जिल्हा आणि गटस्तरावरील पक्षाच्या सर्व समित्या बरखास्त केल्या आहेत. दरम्यान, राजस्थानातील राजकीय पेच अद्याप कायम आहे. भाजपकडून आमदारांचा घोडेबाजार केला जात होता. त्यात भाजपकडून 20-20 कोटींचे आमिष आमदारांना दाखविले जात होते, असा आरोप मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे.

ashok-gahlot-talking-to-media

काँग्रेस पक्षाने मंगळवारी थेट कारवाई करताना सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्रीपद आणि प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी केली. तसेच पायलट समर्थक दोन मंत्र्यांनाही हाकलले. मात्र, हे राजकीय रण अद्याप थांबले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सचिन पायलट यांच्यासह 19 काँग्रेस आमदारांना आपले विधानसभा सदस्यत्व अपात्र का ठरविले जाऊ नये? अशी नोटीस राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष सी. पी. जोशी यांनी बजावली आहे. या नोटिसीला उत्तर देण्यासाठी शुक्रवारपर्यंतची मुदत दिली आहे.

सर्व समित्या बरखास्त

काँग्रेस सतर्वâ झाली असून, राजस्थानातील सर्व जिल्हा आणि गट समित्या बरखास्त केल्या आहेत. नवीन समित्या नियुक्त करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. याबाबत राजस्थानातील काँग्रेस प्रभारी अविनाश पांडे यांनी माहिती दिली.

भाजपमध्ये जाणार नाही – पायलट

आपण भाजपमध्ये जाणार नाही असे सचिन पायलट यांनी सांगितल्याचे ‘एएनआय’ने म्हटले आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आपल्याला बाजूला सारले. सतत डावलले आणि अपमानित केले. आपल्या समर्थकांचा योग्य तो सन्मान केला नाही. नोकरशाहीला माझ्या आदेशाचे पालन न करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. कोणत्याही फाईल पाठविण्यात आल्या नाहीत असे पायलट यांनी म्हटले आहे.

पायलट भाजपचा पाहुणचार का घेत आहेत – सुरजेवाला

भाजपमध्ये जायचे नाही असे वक्तव्य सचिन पायलट यांनी केल्याचे माध्यमांमधून समजते. मग पायलट हरियाणातील भाजपच्या खट्टर सरकारचा पाहुणचार का घेत आहेत, असा सवाल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. पायलट यांनी हरियाणातील भाजपच्या सुरक्षा कवचातून बाहेर यावे. भाजप बरोबर त्यांनी चर्चा बंद करावी. सध्या वास्तव्यास असलेल्या हॉटेलमधून बाहेर पडावे आणि जयपूरला यावे. आपल्या घरी परत यावे, आपले मत मांडावे, चर्चा करावी असे आवाहनही सुरजेवाला यांनी केले आहे. राजस्थानातील काँग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न करणारी भाजप तोंडघशी पडली अशी टीका सुरजेवाला यांनी केला.

उत्तम इंग्लिश बोलणे,  हँडसम दिसणे हेच सर्वकाही नसते

उत्तम इंग्लिश बोलणे, हँडसम दिसणे, मिडियाला चांगले बाइट देणे हेच सर्वकाही नसते असा सणसणीत टोला मुख्यमंत्री गेहलोत यांनी पायलट यांना लगावला आहे. देशासाठी तुमच्या मनात काय आहे, तुमची विचारसरणी, धोरण, कटीबद्धता हे महत्त्वाचे असते. आम्ही ज्या परिस्थितीचा सामना केला तो केला असता तर या पिढीला कळले असते असे गेहलोत म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या