
रेल्वेने प्रवास करायचा असेल तर तिकीट कन्फर्म असणे गरजेचे आहे. वेटिंग लिस्ट तिकीट असल्यास रेल्वेने प्रवास करता येत नाही, असा रेल्वेचा नियम आहे. परंतु रेल्वेने आता या नियमांसंबंधी कठोर अंमलबजावणी करायला सुरुवात केली असून वेटिंग लिस्टमधील प्रवाशी जर आरक्षित डब्यातून प्रवास करत असतील तर अशा प्रवाशांविरुद्ध कारवाई करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे रेल्वेचा प्रवास आता कन्फर्म तिकिटाशिवाय करू नये, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यातi आले आहे. कोणीही हा नियम तोडण्याचा प्रयत्न केल्यास त्याला चालू प्रवासामध्येच बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे. टिकीट चेकिंग करणाऱया टीसींनासुद्धा तसे सक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. वेटिंग तिकीटवर रेल्वेच्या आरक्षित डब्यांमध्ये प्रवास करण्यास रोख लावला जाणार आहे. तिकीट ऑफलाईन पद्धतीने जरी काढले असेल तरी आरक्षित डब्यात प्रवास करता येणार नाही. कन्फर्म तिकीटने प्रवास करणाऱयांच्या सोयीसाठी हा निर्णय लागू केला.
440 रुपयांचा दंड
रेल्वेचा स्पष्ट नियम आहे की, जर तुम्ही तिकीट खिडकीतून तिकीट घेतले असेल आणि ते वेटिंगवर असेल तर तुम्ही ते रद्द करून पैसे परत मिळवू शकता, मात्र असे करण्याऐवजी प्रवासी डब्यात चढून सर्रास प्रवास करतात. वेटिंग तिकीट असलेला प्रवासी आरक्षित डब्यातून प्रवास करताना आढळल्यास त्याला 440 रुपयांचा दंड आकारला जात आहे. तसेच या प्रवाशाला चालू प्रवासातच बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो किंवा सामान्य डब्यात जाण्यास सांगितले जात आहे.