कॉन्स्टसच्या शतकामुळे ऑस्ट्रेलिया ‘अ’ त्रिशतकापार

ऑस्ट्रेलियन आक्रमक फलंदाज सॅम कॉन्स्टसच्या कारकीर्दीत अनेक चढ-उतार आले असले तरी त्याने पुन्हा एकदा झंझावाती खेळ केला. त्याने हिंदुस्थान ‘अ’ विरुद्धच्या पहिल्या बहुदिवसीय सामन्यात शतक ठोकत संघाला पहिल्या दिवसअखेर 5 बाद 337 अशी जबरदस्त धावसंख्या उभारून दिली. मेलबर्नमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराला धक्का देत अर्धशतक ठोकणारा हा खेळाडू नंतर वादाच्या भोवऱयात सापडला होता. मात्र आता त्याने आपल्या आक्रमक फलंदाजीची झलक दाखवली.

आज एकाना स्टेडियमवर पावसामुळे सामन्याला उशिरा सुरुवात झाली. ऑस्ट्रेलिया ‘अ’चा कर्णधार नॅथन मॅकस्वीनीने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. कॉन्स्टस आणि कॅम्पबेल केलावे यांनी आक्रमक फटकेबाजी करत हिंदुस्थान ‘अ’च्या प्रसिध कृष्णा, खलील अहमद, तनुष कोटियन यांच्यासारख्या गोलंदाजांना अडचणीत टाकले. केलावेने 53 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले, तर कॉन्स्टने कोटियनला षटकार खेचत 122 चेंडूंवर आपले शतक झळकावले. चहापानावेळी ऑस्ट्रेलिया ‘अ’ने 37 षटकांत बिनबाद 198 अशी तडाखेबंद सुरुवात केली होती.

पावसामुळे पुन्हा खेळात खंड पडला. मात्र नंतर गुरनूर ब्रारने केलावेचा झेल पकडून संघाला पहिले यश मिळवून दिले. कर्णधार मॅकस्वीनी (1) हर्ष दुबेच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. दुबेनेच कॉन्स्टसला 109 धावांवर त्रिफळाचीत केले. खलील अहमदने ऑलिव्हर पीकला पायचीत करत हिंदुस्थान ‘अ’ला आणखी यश मिळवून दिले. हर्ष दुबेने 88 धावांत 3 विकेट मिळवले. शेवटच्या सत्रात कूपर कोनोली आणि लियाम स्कॉट यांनी पाचव्या विकेटसाठी 109 धावांची भागी करत संघाला 333 धावापर्यंत नेले. कोनोली 70 धावांवर बाद झाला. खेळ थांबला तेव्हा स्कॉट 47 तर जोश फिलीप 3 धावांवर खेळत होता.