सामना प्रभाव- मिंध्यांच्या कंत्राटदारांचे पाप झाकण्यासाठी धावाधाव; भगदाड पडलेल्या काळू नदीवरील पुलाचे काम युद्धपातळीवर

मुरबाड – शहापूरला जोडणाऱ्या काळू नदीवरील नव्या कोऱ्या पुलाला काही दिवसांपूर्वीच भगदाड पडले होते. मिंधे गटाचे उपनेते नीलेश सांबरे याच्या जिजाऊ कन्स्ट्रक्शने हे काम केले होते. मात्र हे पाप झाकण्यासाठी आज रविवार असूनही कामाला जुंपलेल्या एमएसआरडीसीने युद्धपातळीवर पडलेले भगदाड बुजवले आहे. त्यामुळे मिंध्यांच्या लाडक्या कंत्राटदाराला वाचवण्यासाठी अधिकारी इतके मिंधे का, असा सवाल केला जात आहे.

राष्ट्रीय महामार्ग मुरबाड आणि शहापूर क्रमांक ५४८ (अ) हा तालुक्यातून जातो. याच मार्गासाठी काळू नदीवर एमएसआरडीसीच्या माध्यमातून पूल बांधण्यात आला आहे. या पुलाचे काम सुरुवातीला कासवगतीने सुरू होते. दोन वर्षांपूर्वी पुलाचे काम पूर्ण झाले असू असून पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. वाहतूक सुरू होऊन दोन वर्षे लोटले नाही तोच पुलावर मध्यभागी मोठे भगदाड पडले. पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने ही घटना घडल्याचा आरोप होत आहे. याबाबत दैनिक ‘सामना’ने वृत्त प्रसिद्ध करत टीकेची झोड उठवली. यानंतर एमएसआरडीसी प्रशासनाला जाग आली आणि आज रविवार सुट्टी असतानाही पुलाचे दुरुस्तीचे काम उरकण्यात आले.

वाहनचालक म्हणतात यांचे काही खरे नाही
भगदाड पडलेल्या या पुलाचे काम पूर्ण झाले असले तरी वाहनचालकांना प्रशासनावर आणि कंत्राटदाराच्या कामावर विश्वास नाही. ‘दुर्घटनासे देर भली’ असे म्हणत अनेक वाहनचालक या पुलावरून प्रवास न करता लांबचा मार्ग असलेल्या मुरबाड-सरळगाव-संगमेश्वरमार्गे शहापूरला ये-जा करत आहेत. यांचे काही खरे नाही. पैसे खाण्यासाठी काही करतील अशी टीका वाहनचाल क आणि प्रवासी करत आहेत.