सृजन संवाद – राम विजय

>> डॉ. समिरा गुजर जोशी

मागच्या लेखात आपण संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायणाचा अल्पपरिचय करून घेतला. आज कवी श्रीधर यांच्या ‘रामविजय‘ या मराठीतील अतिशय प्रसिद्ध ग्रंथाचा परिचय करून घेवूया. साधारणपणे 17 वे शतक हा त्यांचा काळ मानण्यात येतो. रामविजयाप्रमाणेच हरीविजय, शिवलीलामृत हे ग्रंथही त्यांनी लिहिले, त्यामुळे त्यांच्या आजही टिकून असणाऱया लोकप्रियतेविषयी काही वेगळे सांगायला नको. रामविजयविषयी आपण थोडे बोलूच पण या ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात प्रस्तावनेमध्ये श्रीधरस्वामींनी त्यांना माहिती असलेल्या रामायणांचा उल्लेख केला आहे. ही यादी मुळातून पाहू.

असंभाव्य श्रीरामचरित्र। शतकोटि ग्रंथ सविस्तर ।

वाल्मीक बोलिला अपार । कथासमुद्र अगम्य ।

जो सत्यवतीहृदयरत्न । कथी जगद्गुरु पराशरनंदन ।

तें व्यासोक्त रामायण । कोणा संपूर्ण न वर्णवे ।

वसिष्ठें कथिलें निश्चितीं । तें वासिष्ठरामायण म्हणती ।

शुकें कथिलें नानारीतीं । शुकरामायण बोलती तया ।

जो अंजनीहृदयारविंदभ्रमर । तेणें पाहोन श्रीरामचरित्र ।

कथिलें नाटकरामायण साचार । अपार चरित्र निजमुखें ।

जो परम विश्वासें श्रीरामासी शरण । शक्रारिजनकबंधु बिभीषण ।

तेणें रामचरित्र कथिलें पूर्ण । बिभीषणरामायण म्हणती तया ।

कमलोद्भव विष्णुसुत । तेणें नारदासी कथिलें हें चरित्र ।

तें ब्रह्मरामायण अद्भुत । उमेसी सांगत शिव रामायण ।

जो कलशोद्भव महामुनी । जेणें जलधि आटिला आचमनेंकरूनी ।

तेणें रामकथा ठेविली विस्तारोनी । अगस्तिरामायण म्हणती तया ।

भोगींद्र कथी सर्पांप्रती । तें शेषरामायण बोलिजे पंडितीं ।

अध्यात्मरामायण समस्तीं । ऋषींनीं निवडून काढिलें ।

एक शेषरामायण सत्य । आगमरामायण एक बोलत ।

कूर्मरामायण यथार्थ । कूर्मपुराणीं बोलिलें ।

स्कंदरामायण अपार । एक पौलस्तिरामायण परिकर ।

कालिकाखंडीं सविस्तर । रामकथा कथियेली ।

रविअरुणसंवाद । ते अरुणरामायण प्रसिद्ध ।

पद्मपुराणीं अगाध । पद्मरामायण कथियेलें ।

भरतरामायण चांगलें । एक धर्मरामायण बोलिलें ।

आश्चर्यरामायण कथिलें । बकदाल्भ्यऋषीप्रती ।

मुळापासून इतक्या कथा । कैशा वर्णवतील तत्त्वतां ।

त्यांमाजीं वाल्मीकनाटकाधारें कथा । रामविजयालागीं कथूं ।।

व्यासांनी, वसिष्ठांनीही रामायण सांगितलं होतं ही नवीनच माहिती म्हटली पाहिजे. यातील अनेक रामायणे आज आपल्याला उपलब्ध नसतील. पण रामकथेचा प्रचार आणि प्रसार किती मोठा आहे ह्याचा अंदाज घेण्यासाठी हे उदाहरण उत्तम आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ही बहुधा संस्कृत रामायणे आहेत. इतर प्रादेशिक भाषांमधील रामायणांची माहिती श्रीधर स्वामींना नसावी.

मराठी भाषेत आपल्या आधी होऊन गेलेल्या आदरणीय संतांमध्ये त्यांनी मुकुंदराज, ज्ञानेश्वर माऊली, एकनाथ महाराज, मुत्तेश्वर, समर्थ रामदास स्वामी यांचा उल्लेख केला आहे.  संस्कृत आणि प्राकृत जरी दोन भाषा असल्या तरी एकच अर्थ त्या सांगू शकतात हे विश्वासाने सांगताना ते लिहितात –

तैसें प्राकृत आणि संस्कृत । दोहीमाजी एकचि अर्थ ।

जैसा दोही स्त्रियांचा एक नाथ । दोन हस्त एकाचेचि ।

किंवा दोन पात्रांत पवित्र । एकचि दुग्ध घातलें ।

जैसें त्रिवेणीचें भरलें उदक । दोन पात्रीं गोडी एक । 

मराठी भाषा किती गोड आहे ह्याचा प्रत्यय रामविजय वाचताना येतो. दोन वेगवेगळ्या पात्रात दूध ओतले तरी दूधाची गोडी कमी जास्त होत नाही त्याप्रमाणे रामायणकथा संस्कृतप्रमाणे प्राकृत – मराठीतही गोड वाटते.

महर्षि वाल्मिकींची रामायणकथा जरी डोळ्यासमोर ठेवली असली तरी ही इतकी नानाविध रामायणे वाचल्यानंतर त्याचाही परिणाम श्रीधर स्वामींवर झाला असणारच. म्हणूनच ह्या रामविजयामध्ये थक्क करून सोडणाऱया कथा येतात. आता हेच उदाहरण बघा.

कोणे एक समयी रावण । पुष्पकविमानीं बैसोन ।

कैलासगिरी चढतां पूर्ण । तों नंदी रक्षण महाद्वारीं ।10

म्हणे नको जाऊं लंकापती । शिवउमा आहेत एकांतीं ।

ऐसें ऐकतां मयजापती । परम क्षोभ पावला ।11

नंदीस म्हणे ते वेळे । तुज मर्कटाचेनि बोलें ।

मी न राहें कदाकाळें । जाईन बळेंकरूनियां ।12

रावण कैलासावर आला. शिव-पार्वती एकांतात आहेत तेव्हा आत जाणे योग्य नाही म्हणून नंदीने अडवल्यावर अहंकारी रावण त्याला म्हणाला, “कोण रे तू माकड मला अडवणारा ?’’

ऐसें बोलतां दशकंधर । कोपला तेव्हां नंदिकेश्वर ।

शापशस्त्र अनिवार । ताडिलें सत्वर तेणेंचि ।13

म्हणे उन्मत्त तूं मूढमती ।  तुज नर वानर रणीं वधिती ।

तुवां दशरुद्र पूजिले नीगुती । अकरावा मारुती प्रगटेल ।14

तेव्हा नंदी चिडून म्हणाला, “मी माकड काय ? तुला माकडांची खरी ताकद आता कळेल बघ. कारण नर आणि वानर तुला रणांगणात हरवतील. तू दहा रुद्रांचे पूजन केले असशील पण तुला मारायला 11 वा रुद्र जन्म घेईल, तो म्हणजे मारुती राया.’’

प्रत्येकाने रामायणात आपली भर घातली आहे म्हणा किंवा लोकांमध्ये प्रचलित रामायण असे नोंदवले गेले आहे म्हणा. रामायण कथेच्या या इतक्या आवृत्या बघून थक्क व्हायला होते.

रामविजय ग्रंथाच्या शेवटच्या अर्थात 40 व्या अध्यायात ते म्हणतात –

कीं रामविजय ग्रंथ सुंदर । हें चाळीस खणांचे दिव्य मंदिर ।

सीतेसहीत रघुवीर । क्रीडा करित तेथें पैं ।88

कीं हें चाळिस खणांचे वृंदावन । रघुनाथकथा तुळसी पूर्ण ।

दृष्टांत ती पत्रें जाण । आवर्तन प्रदक्षिणा भक्त करिती ।89

हा दृष्टांत किती सुंदर आहे हे वेगळे सांगायला नको. रामकथेच्या बहरलेल्या तुळशीचे हे वृंदावन भारतीय मनात नित्य मोहरत असते.

ह्या सदरामध्ये आत्तापर्यंत आपण ह्याच तुळशीच्या काही मंज्रिया ओंजळीत धरण्याचा प्रयत्न केला. रामकथेची गोडी इतकी आहे की आपण सर्ववर्गातील वाचकांनी ह्या सदरावर मनापासून प्रेम केले. आपल्या प्रतिक्रियांनी माझा उत्साह वाढवला. हे सदर ह्या लेखाबरोबर विराम घेते आहे. ह्या क्षणी गीतरामायनातील प्रभो मज एकच वर द्यावा ह्या गीतातील काही ओळींची आठवण होते…

जो वरी हे जग, जोगरी भाषण तोवरी नूतन नित रामायण…..

रामायण कथा नवी नवी रूपे घेऊन आपल्यासमोर येतच राहणार….

रामकथा नित वदने गावी 

रामकथा ह्या श्रवणी यावी

श्रीरामा मज श्रीरामाविण दुसरा छंद नसावा…..

n [email protected]

(निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङमयाची अभ्यासक)