
>> डॉ. समिरा गुजर जोशी
महाकवी कालिदास यांची कुमारसंभव ही अलौकिक साहित्यकृती. यातील उमा-बटू संवादात कालिदासांनी शंकर आणि पार्वतीच्या संवादात प्रेमरसाचे यथोचित वर्णन केले आहे. केवळ एखाद्या व्यक्तीच्या नव्हे तर कार्याच्या, ध्येयाच्या प्रेमात असणारी व्यक्ती लोकांच्या बोलण्याचा कधीच विचार करत नाही. हीच खरी अनुरूपता हेच त्यांना सांगायचे आहे.
आपण कालिदासाने बटू रूपातील भगवान शंकर आणि शंकरांच्या प्राप्तीसाठी तप करणारी पार्वती यांच्यात रंगवलेला उमा-बटू संवाद पाहतो आहोत. या प्रसंगात स्वत भगवान शंकर आपल्याच रूपाची, गुणांची थट्टा करत आहेत असा गोड प्रसंग कालिदासाने चितारला आहे. हा प्रसंग वाचत असताना नकळत आपल्या चेहऱयावर स्मित हास्य येते. शृंगार रस तर आहेच, पण त्यातील हास्य रसाची ही उपस्थिती मनाला सुखावणारी आहे.
जेव्हा बटूला कळते की, पार्वती भगवान शंकरांसाठी एवढे कठोर तब करते आहे, तेव्हा तो तिची थट्टा करत म्हणतो, “छे छे! तू हे काय आरंभले आहेस? अगं, तुमचा विवाह सोहळा डोळ्यांसमोर आणून बघ. म्हणजे तुझ्या लगेच लक्षात येईल की, तुमची जोडी अनुरूप आहे की नाही? आता हेच बघ, तू विवाहप्रसंगी मोठय़ा प्रेमाने तुझा नाजूक हात त्याच्या हातात देशील खरी, पण त्याने तुझा हात हातात घेताना तुझ्या हातात सोन्याचे कंकण असेल तर त्याच्या मनगटावर वळवळणारा साप! आता हे दृश्य कसे दिसेल तूच सांग.’’
“आणखी एक गोष्ट तुझ्या लक्षात आली का? तुझे आणि त्याचे पोषाख. म्हणजे त्याबाबतीत तरी समानता आहे असं म्हणता येईल का? कारण तुझे वधू वस्त्र कसे असेल? शुभ्र वस्त्र. त्याला हंसाचे चित्र असणारी लाल किनार…किती सुंदर आणि तो काय नेसून येणार, नुकतेच कापलेले ताजे गजचर्म, ज्यातून अजून रक्ताचे थेंब निथळत आहेत. आता ही तुला अनुरूप जोडी वाटत असेल तर पहा बुवा.
एरवी ऐश्वर्यसंपन्न विवाह सोहळ्यात हत्तीवरून मिरवणूक निघते, पण भगवान शंकर तुला बैलावर बसवून घरी घेऊन जातील. आधीच त्याचे रूप कसे. दोन दिवसांपूर्वी सोडून तीन डोळे आहेत त्याला. कुळाचा काही पत्ता नाही. ना काही पैसा अडका गाठीशी आहे. आता त्याला स्थाणू ( स्थिर, खांब असाही त्याचा अर्थ होतो.) म्हणतात हे खरे, पण यज्ञातील पवित्र खांब आणि स्मशानातील सुळी देण्याचा खांब यात काही फरक आहे की नाही?’’
आता इतके ऐकून घेतल्यावर पार्वतीने उत्तर दिले नसते तरच नवल. ती सात्त्विक संतापाने उत्तरते, “तुझ्यासारख्या मंद बुद्धी व्यक्तीला त्यांची महानता काय कळणार? ते जगाचे स्वामी आहेत. जो स्वतच जगाचा निर्माता आहे, त्याच्या कुळाची काय चौकशी करायची. त्यांचे रूप तुला भयंकर वाटत असेलही, पण अवघ्या जगासाठी ते शिव अर्थात शुभंकर आहेत हे विसरू नकोस. त्यांनी धारण केलेले चिता भस्म जेव्हा तांडव करताना सांडते तेव्हा प्रत्यक्ष देव ते मस्तकी लावतात. त्यांच्या बैलावरून निघणाऱया यात्रेत ऐरावतवर मालकी असणारा इंद्र पायी चालत असतो. त्यामुळे तू त्यांच्याविषयी काही न बोलणेच योग्य. माझं मन त्यांच्या ठायी स्थिर झाले आहे आणि जो स्वतच्या इच्छेप्रमाणे वागतो ना, तो इतरांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही.’’ कविकुलगुरू कालिदास लिहितात, ‘न कामवृत्तिर्वचनीयम् ईक्षते.’ प्रेमात पडलेल्यांचे यापेक्षा नेमके वर्णन कसे करता येईल? केवळ एखाद्या व्यक्तीच्या नव्हे तर कार्याच्या, ध्येयाच्या प्रेमात असणारी व्यक्ती लोकांच्या बोलण्याचा कधीच विचार करत नाही.
…आणि आता ती त्याच्याशी थेट न बोलता आपल्या संतापावर नियंत्रण मिळवत असताना आपल्या सखीला म्हणते, “बघ याच्याकडे, अजूनही याचे बोलणे संपले नाही असेच वाटते, पण आता आपण इथे थांबायला नको. कारण निंदा करणारा तर पाप करत असतोच, पण ऐकणाराही त्यात भागीदार होतो.’’ असे म्हणून ती वळणार तोच भगवान शंकरांनी तिचा हात धरला आणि ते मूळ रूपात प्रकट झाले. पार्वतीला या क्षणी काय वाटले असेल याची आपण कल्पना तरी करू शकतो का? पण कालिदास मात्र या प्रसंगाचे वर्णन संस्कृत साहित्यातील एका अजोड श्लोकात करतात.
तं वीक्ष्य वेपथुमती सरसाङ्गयष्टिर्
विक्षेपणाय पदम् उद्धृतम् उद्वहन्ती।
मार्गाचलव्यतिकराकुलितेव सिन्धुः
शैलाधिराजतनया न ययौ न तस्थौ।।
अशा अचानक घडलेल्या प्रसंगाने पार्वती इतकी भांबावली की, जागच्या जागी ती थरथरत होती. पुढे जाण्यासाठी तिने पाय उचलला होता खरा, पण तो ना पुढे पडला ना मागे! एखाद्या नदीच्या मार्गात अचानक समोर पर्वत उभा ठाकला तर जशी अवस्था होते तशीच स्थिती तिचीही झाली. ना ती पुढे जाऊ शकली, ना थांबली.
एका बाजूला तिला लाज वाटून याक्षणी पळून जायचे आहे, तर दुसऱया बाजूला ज्याने हात धरला आहे त्याच्यापासून क्षणभरही दूर जायचे नाही हा तिचा गोंधळ आणि त्यामुळे तिचे जागीच खिळून राहणे याचे हे वेधक वर्णन इथे येते. न ययौ न तस्थौ? – न जाऊ शकली, न थांबू शकली.
(लेखिका निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङमयाच्या अभ्यासक आहेत.)




























































