खणखणीत.. एका षटकात 39 धावा; सामोआच्या व्हिसरने मोडला युवी, रोहित, पोलार्डचा विश्वविक्रम

समोआच्या डॅरियस व्हिसरने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये अनेक स्टार फलंदाजांचे विक्रम मोडीत काढले. आतापर्यंत टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एका षटकात केवळ 36 धावा झाल्या होत्या. मात्र डॅरियस व्हिसरने वनुआटु संघाविरुद्ध खेळताना एका षटकात 39 धावांची लयलूट करत नवीन विश्वविक्रम रचला.

आंतरराष्ट्रीय टी-20 च्या एका षटकात 39 धावा… हे अशक्य वाटत असले तरी ते शक्य झाले. डॅरियस व्हिसरने एका षटकात 39 धावा चोपून काढत युवराज सिंग, कायरॉन पोलार्ड, निकोलस पूरन, दीपेंद्र सिंग आयरी, रोहित शर्मा व रिंपू सिंग यांचा विक्रम मोडला.

पुरुषांच्या टी-20 क्रिकेट विश्वचषक उपप्रादेशिक पूर्व आशिया-पॅसिफिक पात्रता स्पर्धेमध्ये हा नवा विक्रम घडला. समोआचा फलंदाज डॅरियस व्हिसरने एका षटकात सहा षटकारांसह एपूण 39 धावा केल्या. यामध्ये सहा षटकार आणि तीन धावा नो बॉलवर मिळाल्या. विशेष म्हणजे नो बॉल पडल्यामुळे व्हिसरला तीन फ्री हिट मिळाल्या आणि त्या फ्री हिटवर तीन षटकार ठोकले. हे षटक नऊ चेंडूंचे होते.

डॅरियस व्हिसरने वानुआटू संघाच्या निपिकोच्या गोलंदाजीवर षटकाच्या पहिल्या तीन चेंडूंवर सलग तीन षटकार ठोकले. त्यानंतर चौथा चेंडू नो बॉल होता, परिणामी एक धाव झाली. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर डॅरियसने आणखी एक षटकार ठोकला. त्यानंतर ओव्हरचा पाचवा चेंडू डॉट होता. यानंतर सहावा चेंडू नो बॉल होता, ज्यावर एक धाव आली. पुढचा चेंडू पुन्हा नो बॉल होता, ज्यावर षटकार मारला गेला आणि शेवटच्या फ्री हिट बॉलवर षटकार ठोपून डॅरियस व्हिसरने एका षटकात 39 धावांची लयलूट केली.

डॅरियस व्हिसरची शतकी खेळी

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सामोआ संघाने 20 षटकात सर्वबाद 174 धावांवर केल्या. यात डॅरियस व्हिसरने संघासाठी 62 चेंडूंत 5 चौकार आणि 14 षटकारांच्या घणाघात करीत 132 धावांची वादळी खेळी केली. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना वनुआटु संघ 20 षटकांत 9 बाद 164 धावाच करू शकला.