
दारूच्या नशेत घरी आलेल्या मुलाने पत्नीला शिवीगाळ करण्यावरून हटकणाऱ्या आई-वडिलांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चिपळूण तालुक्यातील देवखेरकी, तळ्याचीवाडी येथे 12 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 8 वाजता ही घटना घडली. इतकेच नव्हे, तर भांडणात सोडवा-सोडव करण्यासाठी आलेल्या आईच्या डोक्यात चुलीतील लाकूड मारून तिला गंभीर जखमी केले आहे.
याप्रकरणी फिर्यादी राजेंद्र गुणाजी हळदे (53) यांनी 13 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 9 वाजून 10 मिनिटांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, ऋतिक राजेंद्र हळदे (रा. देवखेरकी, तळ्याचीवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी ऋतिक राजेंद्र हळदे हा 12 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दारू पिऊन घरी आला होता. घरी आल्यानंतर त्याने पत्नीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हे पाहून वडील राजेंद्र हळदे यांनी त्याला ‘तू तुझ्या बायकोला शिवीगाळी का करतोस?’ असे विचारले. याचा राग येऊन आरोपी ऋतिक याने वडील राजेंद्र हळदे आणि आईला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने हाताच्या थापटाने दोघांनाही मारहाण केली.
यानंतर आरोपी ऋतिकने घरातील चुलीजवळ वापरण्यासाठी ठेवलेल्या लाकडातील एक लाकूड उचलले आणि ते हातात घेऊन वडिलांना मारण्यासाठी त्यांच्या अंगावर धावून आला. यावेळी फिर्यादी राजेंद्र हळदे यांची पत्नी, म्हणजेच आरोपी ऋतिकची आई, या भांडणात सोडवा-सोडव करण्यासाठी मध्ये आल्या. याच वेळी आरोपी ऋतिकने त्याच्या हातातील चुलीतील लाकूड आईच्या डोक्यात जोरात मारले. या हल्ल्यात आई गंभीर जखमी झाली असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वडिलांच्या फिर्यादीवरून चिपळूण पोलिसांनी आरोपी ऋतिक राजेंद्र हळदे याच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.