सांगलीतील दलित महासंघाचे उत्तम मोहिते यांचा खून; वाढदिवसाच्या कार्यक्रमातच यांच्यावर तुटून हल्ला, एक हल्लेखोरही ठार

दलित महासंघाच्या मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम जिनाप्पा मोहिते (वय ३८) यांचा मंगळवारी मध्यरात्री त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातच खून केला. यावेळी हल्लेखोरांपैकी एकावर चाकूचा वार झाल्याने त्याचाही मृत्यू झाला. एकाच घटनेत दोघे ठार झाले. सांगलीत सुरू असलेल्या खुनाच्या मालिकेने शहरात खळबळ उडाली आहे.

एकमेकातील धुसफूस, वर्चस्व वादातून उत्तम मोहिते यांचा खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आठजणांच्या टोळक्याने चाकू, लोखंडी रॉड आणि काठ्यांनी हल्ला केला. एका हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दुसरा हल्ल्यात मरण पावला, तर उर्वरित सहाजणांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शहरातील गारपीर दर्गा चौकानजिक उत्तम मोहिते यांचे घर आहे. घराबाहेर मंगळवारी रात्री त्यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू होता. जेवणाचा कार्यक्रम झाल्यानंतर मध्यरात्री आवराआवर सुरू असतानाच हल्लेखोरांचे टोळके शिवीगाळ करत उत्तम मोहिते यांच्या दिशेने धावत आले. यावेळी मोहिते घरात पळाले. मात्र, हल्लेखोरांचे टोळके घरात घुसले आणि उत्तम मोहिते यांच्यावर तुटून पडले. यावेळी हल्लेखोरांपैकी शाहरुख रफीक शेख (वय – २६) याच्या मांडीवरही वार झाला. उत्तम मोहिते यांचा खून करून जाताना हल्लेखोरांनी जखमी साथीदार शाहरुख याला उचलून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याच्याअगोदर उत्तम मोहिते यांना पुतण्या योसेफ मोहिते याने सिव्हील हॉ स्पिटलमध्ये दाखल केलेले होते. तेथे डॉ क्टरांनी उत्तम मोहिते यांना मयत घोषित केले, तर हल्लेखोर शाहरुख याचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला.

उत्तम मोहिते यांच्या पत्नी ज्योती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सांगली शहर पोलिसांनी संशयित गणेश मोरे, सतीश लोखंडे, शाहरुख शेख, बन्या उर्फ यश लोंढे, अजय घाडगे, जितेंद्र लोंढे, योगेश शिंदे, समीर ढोले (सर्वजण रा. इंदिरानगर, सांगली) यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.

उत्तम मोहितेंवर दहा गुन्हे

उत्तम मोहिते हे दलित महासंघाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात असले, तरी त्यांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे समोर आले आहे. खंडणी, शासकीय कामात अडथळा, बलात्कार यांसारखे १० गुन्हे त्यांच्यावर दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. २०२१मध्ये मोहिते यांना एक वर्षासाठी सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते.